महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी या महाराष्ट्र गेल्या चार वर्षात अनुभवतोच आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच अजित पवारांना का बरोबर घेतलं त्याचंही उत्तर दिलं आहे. १६ जुलै या दिवशी होणाऱ्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस येणार आहेत. यामध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

“जेव्हा उद्धव ठाकरे तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा तुम्हाला अजित पवारांना बरोबर घेऊन शपथ घ्यावी लागते.” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत १६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीचा काही अंश पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचं म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे.

हे पण वाचा- अजित पवारांसाठी देवेंद्र फडणवीसांनी अर्थमंत्रीपद सोडलं? ‘त्या’ जीआरमुळे तर्क-वितर्कांना उधाण; पाच सदस्यांच्या यादीमध्ये…

२०१९ मध्ये काय घडलं होतं?

२०१९ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर जे निकाल लागले त्यात भाजपाला १०५ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ५४ जागा मिळाल्या. महायुतीला जनतेने कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन दोन्ही पक्षांचा वाद सुरु झाला. तो युती तुटल्यानंतरच मिटला. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह जाण्याची तयारी दाखवली होती. त्यावेळी २३ नोव्हेंबर २०१९ या दिवशी पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र हे सरकार ८० तास चाललं आणि पडलं. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली होती आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

हे पण वाचा “उद्धव ठाकरे ‘रात गई, बात गई’ असं म्हणाले, तर…”, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार २९ जून २०२२ पर्यंत चाललं. पण त्याच्या आठ दिवस आधी, म्हणजेच २१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी बंड करत उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. तर एकनाथ शिंदे हे ३० जून २०२२ ला राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवारही सत्तेत सहभागी झाले आहेत. या सगळ्या घडामोडी मागच्या तीन ते चार वर्षांच्या कालावधीत घडल्या. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When uddhav thackeray stabs us in the back we have to form the government with ajit pawar said devendra fadnavis scj