Who is Navina Bole: सध्या हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नवीना बोले खूप चर्चेत आली आहे. या चर्चेचं कारण आहे, तिने लोकप्रिय दिग्दर्शक साजिद खानवर केलेले गंभीर आरोप. नवीनाने साजिदवर कास्टिंग काऊचचा आरोप केला आहे. “माझ्या आयुष्यातला सर्वात भयंकर अनुभव मी साजिद खानकडून घेतला आहे. घरी बोलावून साजिदने मला कपडे काढून अंतर्वस्त्रांमध्ये येऊन बसायला सांगितलं होतं,” असा आरोप नवीनाने केला आहे. ही नवीना बोले नेमकी कोण आहे? जाणून घेऊया.
अभिनेत्री नवीना बोलेने २००८मध्ये ‘मिले जब हम तुम’ मालिकेत दीया भूषणची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘जिनी औ जुजू’ आणि ‘इश्कबाज’ या मालिकांमुळे लोकप्रिय झाली. नवीनाचा जन्म मुंबईतला आहे. तिने कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केलं आहे. ती फक्त अभिनेत्री नाहीतर भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर नवीनाला लोकप्रिय ब्रँडच्या जाहिराती मिळाल्या.
नवीना जगजीत सिंह, गुलाम अली, अबीदा परवीन, अमान और अयान अली बंगश यांच्यासह एका म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली होती. १९९८ पासून नवीनाने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. ‘सीआयडी’, ‘श्श्श्श् कोई है’, ‘सपना बाबुल का… बिदाई’, ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘यहां मैं घर-घर खेली’, ‘कुमकुम भाग्य’, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ सह तिने ३५ मालिकांमध्ये काम केलं आहे. नवीनाने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. २०२३ मध्ये ती ‘हनीमून सूट रूम नंबर ९११’ आणि २०२४ मध्ये ‘रसीली रातें’मध्ये पाहायला मिळाली होती.
नवीना बोलेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, २०१७ मध्ये तिने करण जीतबरोबर लग्न केलं होतं. पण दोघांचा संसार जास्त काही टिकला नाही. २०२४मध्ये नवीना व करणचा घटस्फोट झाला. माहितीनुसार, दोघांना एक मुलगी आहे, जिचं नाव किमायरा आहे. २०१९ मध्ये तिचा जन्म झाला होता.
नवीना बोलेने साजिद खानवर केलेला आरोप…
नवीनाने सुभोजित घोष यांच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत साजिद खानवर गंभीर आरोप केले. ती म्हणाली की, माझ्या आयुष्यात सर्वात भयंकर अनुभव मी साजिद खान या माणसाकडून घेतला आहे. साजिद खानला आयुष्यात मी पुन्हा कधीही भेटणार नाही. तो फक्त महिलांची बेअब्रू करतो आणि त्यांनी आवाज उठवला की एक पाकीट त्यांना देतो, त्यांचा अनादार करतो. साजिद खान हे बेबीसाठी कास्टिंग करत होता. त्यावेळी मी खरंच खूप उत्सुक होते. मी त्याच उत्साहात त्याला भेटायला गेले. तेव्हा साजिद खान मला म्हणाला जा तुझे सगळे कपडे काढ आणि अंतर्वस्त्रांमध्ये इथे येऊन बस. मला बघायचं आहे की तू कम्फर्टेबल आहेस? २००४ ते २००६ या कालावधीतली ही बाब आहे. मला ते आठवून अजूनही अंगावर काटा येतो.