टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी दुपारी मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर तिच्या आई वनिता शर्मा यांनी तिचा सह-कलाकार आणि बॉयफ्रेंड शिझान खानविरोधात तक्रार दिली. शिझानने मुलीची फसवणूक केली. तो तिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या मुलीबरोबरही होता. त्याने आपल्या मुलीचा वापर केला, असे अनेक आरोप तुनिषाच्या आईने केले आहेत.
शिझान सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणात शिझानची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, शिझानने तुनिषाच्या आईचे आरोप फेटाळून लावल्याचं समोर आलंय. आपला धर्म वेगळा होता आणि वयातील अंतर यामुळे आपण तुनिषापासून दूर झाल्याचं शिझानचं म्हणणं आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी शिझानच्या कथित गर्लफ्रेंडचा शोध सुरू केला आहे, ज्याचा उल्लेख तुनिषाच्या कुटुंबीयांनी केला आहे. तुनिषाच्या आत्महत्येत शिझानच्या कथित गुप्त गर्लफ्रेंडची भूमिका काय? याबद्दल पोलीस तपास करत आहेत. तसेच तुनिषाचं त्या मुलीशी कधी बोलणं झालं होतं का, याचाही शोध पोलीस शोध घेत आहेत. टीव्ही ९ हिंदीने याबद्दल वृत्त दिलंय.
“शिझानने माझ्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं अन्…”; तुनिषाच्या निधनानंतर आईचा आक्रोश
याशिवाय या मुलीबाबत तुनिषाला कोणी माहिती दिली? प्रश्न असाही उपस्थित होत आहे. शिझानने स्वतः तुनिषाला सांगितलं की आणखी कुणी सांगितलं, याबद्दल पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, शिझानने दुसऱ्या मुलीसाठी तुनिषाशी ब्रेक-अप केलं होतं, असं तिच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. पण अजूनपर्यंत या प्रकरणात इतर कोणत्याही मुलीचं नाव आलेलं नाही. त्यामुळे शिझानने खरंच दुसऱ्या मुलीमुळे तुनिषाशी ब्रेकअप केलं, की त्याचं कारण वेगळं होतं, याचा उलगडा पोलीस तपासातूनच होईल.