Sharmishtha Raut: अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सध्या वैयक्तिक कारणामुळे खूप चर्चेत आली आहे. शर्मिष्ठा आता आई झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या तीन महिन्यांच्या लाडक्या लेकीचं बारसं मोठ्या थाटामाटात पार पडलं. तेव्हापासून शर्मिष्ठा चर्चेचं कारण झाली आहे. शर्मिष्ठाच्या लेकीच्या बारशातील फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत. नुकतंच अभिनेत्रीनं लेक रुंजीच्या नावामागची गोष्ट सांगितली.

मुलीच्या बारशानिमित्तानं शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाईनं ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी तेजसला विचारलं की, नाव ठरवताना एका मिनिटांत एकमत झालं नसेल? यावर मग रुंजी नावाची निवड कोणी केली? तर तेजस म्हणाला, “नाही. हे एकमत होणारचं होतं. कारण मी हिला सांगितलेलं, हे डिपार्टमेंट तुझं आहे आणि मला हे माहीत होतं की, ती काहीतरी वेगळंचं, युनिक नाव निवडेल. जे छान असेल. जेव्हा पहिल्यांदाच तिनं मला हे नाव सांगितलेलं, मी पटकन डन केलं आणि मलाही ते खूप गोड नाव वाटलं. नावाचा अर्थही मला आवडला.”

पुढे शर्मिष्ठा राऊत म्हणाली की, रुंजीच्या नावामागे एक छोटीशी गोष्ट आहे. मी आणि प्रतीक्षा ताई ‘अबोली’ नावाची मालिका करत होतो. आता ती मालिका सोडून मला जवळपास सात-आठ महिने झाले आहेत. कारण मेडिकल संबंधित गोष्टीमुळे मी मालिका सोडली. पण, त्यावेळेला प्रतीक्षा ताई ( प्रतीक्षा लोणकर ) मला भेटली, तेव्हा आमच्या अशाच गप्पा झाल्या. मी तिला विचारलं की, तुझ्या मुलीचं नाव काय आहे? तर ती मला म्हणाली, ‘रुंजी.’ तर मी आश्चर्याने म्हटलं, रुंजी! याचा अर्थ काय आहे?

“मग तिनं त्याचा अर्थ सांगितला. तेव्हा मला असं झालं की, अरे बापरे. हे फार वेगळं नाव आहे आणि खूप सुंदर नाव आहे. त्यावेळी मी तिला म्हटलं होतं, मला जर मुलगी झाली तर हे नाव मी चोरणार आहे. मग ती म्हणाली, म्हणजे काय…तू ठेवचं. नंतर नाव शोधण्याच्या प्रोसेममध्ये मी तेजसला ‘अबोली’चा तो किस्सा सांगितला. तेव्हा तो मला म्हणाला, आवडलं आहे. तेच ठेऊ या. त्यामुळे ‘रुंजी’ नावाची मूळ गोष्ट मी प्रतीक्षा ताईकडून ऐकली,” असं शर्मिष्ठाने सांगितलं.

दरम्यान, रुंजीच्या बारशाला शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाईनं खास मराठमोळा लूक केला होता. शर्मिष्ठानं पांढऱ्या आणि लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर तेजसनं बायकोला मॅचिंग पांढऱ्या रंगाचा कुर्ता, धोती, ज्यावर पैठणीचं लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं. दोघं या मराठमोळ्या पेहरावात खूप सुंदर दिसत होते.