‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांच्या केळवणाचे आणि बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले होते. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीया दिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांनी अचानक अक्षय्य तृतीया दिवशी साखरपुडा कसा केला असा प्रश्न पडला होता. नुकतंच यामागचे कारण समोर आले आहे.
अभिनेता हार्दिक जोशी हा नुकतंच झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने जीव माझा रंगला या मालिकेबरोबरच त्याच्या लव्हस्टोरीबद्दलही भाष्य केले. यावेळी त्याने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी साखरपुडा करण्यामागचे खास कारणही सांगितले. या खास कारणामुळे त्या दोघांनी अक्षय्य तृतीयेला म्हणजे ३ मे रोजी साखरपुडा केला.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी
याबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, “मी तिला लग्नाबद्दल विचारल्यानंतर तिने माझी काही अडचण नाही, पण तुला एकदा घरी येऊन बोलावे लागेल, असे सांगितले होते. त्यानंतर मी अक्षयाच्या घरी गेलो. तोपर्यंत मी लग्नाबद्दल काहीही विचार केला नव्हता. मी त्यांना सर्व काही सांगितलं. त्यावर तिच्या कुटुंबाने ठिक आहे आम्ही विचार करुन सांगतो, असे म्हटलं होतं.”
“यानंतर मी माझी मालिका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं यात व्यग्र झालो. त्याच मालिकेच्या एका भागाचे शूटींग करण्यासाठी मी जात असताना मला अचानक अक्षयाचा फोन आला. मी तो उचलला तर ती म्हणाली तू मेसेज वाचला का? फोटो बघितलास का? असे विचारले. त्यावर मी नाही असं तिला म्हटलं. फोटो बघ आणि फोन कर, असं म्हणत तिने फोन ठेवला. मी तो फोटो पाहिला तर त्यावर १, २, ३ आणि २७, २८ अशा तारखा लिहिल्या होत्या. या तारखा साखरपुड्यासाठी काढलेल्या होत्या.
मला हे सर्व २० एप्रिलला समजले, म्हणजे साखरपुड्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असताना मला हे समजले. त्यात तिची इच्छा होती की तिच्या वाढदिवसाला साखरपुडा करायचा. तिचा जन्म अक्षय्य तृतीयाचा आहे. म्हणून मग ३ मे रोजी साखरपुडा केला”, असे हार्दिकने सांगितले.
आणखी वाचा : “सणांच्या शुभेच्छा देताना त्यापुढे हॅप्पी लिहू नका कारण…” केतकी चितळेची पोस्ट पुन्हा चर्चेत
दरम्यान अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. तसेच त्यांची लग्नपत्रिका किंवा लग्न स्थळ याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यांचे अनेक चाहते त्यांच्या लग्नाच्या दिवशाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.