पडद्यावर दिसणाऱ्या अनेक नायिका सुंदर दिसतात, गौरवर्णीय असतात. त्यामुळे अभिनय क्षेत्रात जायचे, तर सुंदर रूप असले पाहिजे, असा एक समज पाहायला मिळतो. काही कलाकृती अशा विषयांवर भाष्यही करतात. ‘स्टार प्रवाह’वर प्रदर्शित झालेली रंग माझा वेगळा ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत दीपा हे प्रमुख पात्र होते. दीपाचा रंग यामध्ये सावळा दाखवण्यात आला होता. अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde)ने दीपाची भूमिका साकारली होती. या पात्रासाठी ती सावळी दिसेल, असा तिचा मेकअप केला जायचा. आता या मालिकेत जर सावळी मुलगी दाखवायची होती, तर सावळ्या रंगाच्या अभिनेत्रीला का कास्ट केले नाही, रेश्माला ही भूमिका कशी मिळाली, याबद्दल या मालिकेचा लेखक व अभिनेता अभिजीत गुरूने एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला अभिजीत गुरू?
‘सेलिब्रिटी कट्टा’ला अभिजीत गुरूने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले गेले की, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा हे मुख्य पात्र होते. तिला खरं तर सावळी केलेलं होतं. प्रेक्षकांच्यादेखील अशा प्रतिक्रिया आल्या होत्या की, जर तुम्हाला सावळ्या मुलीचीच गोष्ट दाखवायची आहे. तर एखाद्या गोऱ्या मुलीला तुम्ही सावळं का करता? खरोखर सावळ्या मुलीला का दाखवत नाही? त्यावर बोलताना अभिजीत गुरूने म्हटले, “प्रेक्षकांची ही प्रतिक्रिया मी खूप वेळा ऐकली आहे. मी त्यांना कसं उत्तर देऊ? आता ती मालिका ऑन एअर नाहीये. रोज त्या मुलीला काळा मेकअप करायला लागायचा. त्या उन्हामध्ये तिला किती वेळा घाम यायचा. तो काळा मेकअप सतत बदलत राहायचा, हे जास्त कठीण काम आहे, असं वाटत नाही का? असं कष्टाचं काम असेल, तर कोणी ते का करेल? सोपं काम का नाही करणार? म्हणजे यांनी काम सोपं होण्यासाठी प्रयत्न केले नसतील?”
पुढे बोलताना अभिनेत्याने म्हटले, “प्रयत्न केले. मी पहिल्या दिवसापासून त्या मालिकेशी निगडित आहे. त्यांनी सावळ्या मुलीसाठी जवळजवळ १०० मुलींची ऑडिशन घेतली होती. त्या १०० मधून चार ते पाच मुली सिलेक्ट झाल्या होत्या. कारण- बाकींच्या मुलींना तसं करता येत नव्हतं. मी त्यांच्या ऑडिशन्ससुद्धा बघितल्या. काही उगाच आल्या होत्या, काही खरंच चांगल्या अभिनेत्री होत्या, काहींना जमत नव्हतं. काही तिथे सूट करत नव्हत्या,अशा बऱ्याच जणी होत्या. असं नाही की, त्यातून आम्हाला कोणी मिळाल्या नाहीत. त्यांनी सावळ्या रंगाच्या चार ते पाच मुली निवडल्या होत्या. त्या पाचही पोरी नाही म्हणाल्या. मग आता चॅनेल काय करणार? मी त्या पोरींची नावं सांगू शकत नाही. मी तिथे होतो. पाचही पोरींनी काही ना काही कारणं सांगून मालिका नाकारली. मला मालिका करायची नाही, मला सिनेमाच करायचा आहे, माझं आता एक नाटक सुरू आहे. मला अमुक तमुक हे पटत नाही, अशी कारणं त्या मुलींनी दिली. एका मुलीनं तर पैशावरून मालिका नाकारली. काळ्या किंवा सावळ्या मुलींवर अन्याय करतोय, असं काही झालं नाही. बरं चॅनेलमधील लोक आले होते. सगळ्या मुलींच्या ऑडिशन्स मी पाहिल्या होत्या, त्या सिलेक्टसुद्धा झाल्या होत्या; पण त्या नाही म्हणाल्या, त्याला काय करणार?”
“एवढं मोठं कॉर्पोरेट आहे. त्यांनी मालिकेची तारीख ठरवली होती. या तारखेला त्यांना मालिका बदलणं अनिर्वाय होतं. मग त्या काळात जर या पाचही मुली नाही म्हणत असतील, तर काय करणार? त्यातल्या त्यात बरी कोण आहे, जी सगळ्या गोष्टींमध्ये उत्तम आहे, अभिनयदेखील चांगला करते आणि स्वत:ला सावळं करून घ्यायला तयार आहे. तिला बाहेर फिरताना त्रास होत होता. तिला तिच्या खऱ्या रंगातले फोटो टाकण्यास परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत तिनं चार वर्षं काढली”, असे म्हणत अभिजीत गुरूने रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची भूमिका निभावलेल्या अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या कामाचे कौतुक केले.
दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका गाजल्याचे पाहायला मिळाले