Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाची पहिल्यादिवसापासून चर्चा होत असल्याचे दिसत आहे. मात्र सगळ्यात जास्त चर्चा महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुख सूत्रसंचालन करणार या गोष्टीची झाली. गेले चार सीझन यशस्वीपणे सूत्रसंचालन करणाऱ्या महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुखला ही जबाबदारी का देण्यात आली, असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून विचारले जात होते. रितेश देशमुख पहिल्यांदाच ही जबाबदारी घेणार असल्याने ती तो यशस्वीपणे पार पाडणार का? याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागले होते. आता कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले केदार शिंदे?

केदार शिंदे यांनी अमोल परचुरेच्या युट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या यशाबद्दल बोलताना केदार शिंदे यांनी म्हटले, “माझ्या संपूर्ण टीममुळे हे यश बघायला मिळत आहे. सुषमा राजेश या मराठी, कन्नड, तमिळ या तीन भाषांच्या कलर्सच्या क्लस्टर हेड आहेत. त्या ज्या पद्धतीने माझ्यामागे आणि मग मी या सगळ्यांच्यामागे उभा राहिलेलो आहे, त्यामुळे हे यश मिळालेले आहे आणि हे कोणा एका माणसाचे यश नाही. बिग बॉस करणे खूप अवघड आहे. कारण स्पर्धक २४ तास आतमध्ये राहतात पण बाहेर राहून तुम्ही २४ तास आतमध्येच राहता. तो एक संसार आहे. एकतर तुम्हाला उत्तम कास्टिंग मिळायला लागतं आणि तुम्हाला ते डिझाइन नीट करावं लागतं. त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला रितेश देशमुखसारखा होस्ट मिळावा लागतो.”

याबद्दल पुढे बोलताना केदार शिंदे म्हणतात, “महेश दादांबद्दल मला अत्यंत प्रेम, जिव्हाळा आहे. पण ज्यावेळी असं ठरलं की यावेळचा बिग बॉस तरुण असायला पाहिजे. तो थोडा वयानुसार आताचा पाहिजे. आता आपण २०२४ मध्ये आहोत. आम्हाला जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा आम्ही रितेश भाऊंकडे गेलो आणि रितेश भाऊ स्वत:देखील बिग बॉसचे चाहते असल्याने त्यांनी ती जबाबदारी स्विकारली. ज्या पद्धतीने ते करताहेत हे कौतुकास्पद आहे. कारण पहिल्या दिवसापासून महेशदादा आणि रितेश देशमुख यांची तुलना तर शंभर टक्के होणारच होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, सुनिल गावस्कर चांगलाच खेळायचा पण सचिन तेंडुलकर वाईट खेळत नव्हता. मग सचिन तेंडुलकर चांगला खेळत होता तर विराट आणि रोहित वाईट खेळत नाहीत. शेवटी प्रत्येकाची एक स्टाइल असते. रितेश भाऊंनी त्यांच्या स्टाइलने, ज्या पद्धतीने भाऊचा धक्का सादर करतात. मला असं वाटतं की हे एकत्रित यश आहे. एका कोणत्या माणसामुळे यश मिळालं आहे, असं आपण म्हणू शकत नाही.”

हेही वाचा: अमिताभ बच्चन यांनी रजनीकांत यांची ३३ वर्षांपूर्वीची सांगितली आठवण, म्हणाले, “तो जमिनीवर झोपायचा…”

दरम्यान, ‘बिग बॉसच्या मराठी’च्या पाचव्या पर्वाची पहिल्या दिवसापासून चर्चा होताना दिसत आहे. अनेकदा रितेश देशमुख आणि महेश मांजरेकर यांची तुलनादेखील होताना दिसते. आता बिग बॉस मराठीच्या घरात पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why riteish deshmukh as a host of bigg boss season 5 instead of mahesh manjrekar reason reveals by kedar shinde colors marathi programming head nsp