बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी चित्रपटांतून तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेच आहे. पण, त्याबरोबरच अमिताभ बच्चन हे त्यांच्या कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमाद्वारे सूत्रसंचालकाच्या भूमिकेतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. ‘कौन बनेगा करोडपती’च्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्सेही सांगताना दिसतात. बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी आता जाण्याची वेळ झाली, अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन निवृत्ती घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर ते निवृत्ती घेत नसल्याचे स्पष्ट केले होते. या सगळ्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स (IIHB) आणि रिफ्युजन ऑफ रेड लॅब यांनी एक सर्वेक्षण केले. जर अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सूत्रसंचालनातून निवृत्ती घेतली, तर कोणता कलाकार या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार, याबद्दल हे सर्वेक्षण होते.

इंडियन इंस्टिट्युट ऑफ ह्युमन ब्रँड्स (Indian Institute of Human Brands (IIHB)) आणि रिफ्युजन ऑफ रेड लॅब(Rediffusion’s Red Lab) यांनी घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, जर अमिताभ बच्चन यांनी निवृत्ती घेतली. तर त्यांच्या जागी कोण सूत्रसंचालन करणार, या प्रश्नावर चाहत्यांनी उत्तरे दिली. चाहत्यांनी शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दिली. तर, तिसऱ्या स्थानावर महेंद्रसिंग धोनीचे नाव होते. या सर्वेक्षणामध्ये ७६८ जणांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये ४०८ पुरुष आणि ३६० स्त्रियांचा समावेश होता. या सर्वेक्षणाच्या अहवालाबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत अमिताभ बच्चन किंवा ‘कौन बनेगा करोडपती’चे निर्माते यापैकी कोणीही वक्तव्य केलेले नाही.

‘कौन बनेगा करोडपती’चा शो अमिताभ बच्चन २००० सालापासून होस्ट करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता ते १६ व्या सीझनचे सूत्रसंचालन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये त्यांनी ते निवृत्ती घेत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी म्हटले होते की, माझी कामावर जाण्याची वेळ झाली होती. जेव्हा मी सेटवरून पहाटे २ वाजता निघतो तेव्हा घरी पोहोचेपर्यंत १-२ तास लागतात. ते लिहिताना मला झोप लागली. त्यामुळे ते तसेच राहिले. जाण्याची वेळ झाली, असे लिहिले आणि मी झोपी गेलो.

कामाच्या बाबतीत बोलायचे, तर अमिताभ बच्चन याआधी वेट्टैयन चित्रपटात दिसले होते. आता ते आगामी काळात कोणत्या चित्रपटात दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader