‘पारू’ (Paaru) मालिकेत काही दिवसांपूर्वीच अनुष्का या पात्राची एन्ट्री झाली आहे. अनुष्काने किर्लोस्कर कुटुंबीयांच्या आयुष्यात येत त्या सर्वांची मने जिंकली आहेत. आत्मविश्वास, संयम, संकटातून मार्ग काढण्याची कुवत या सगळ्या गुणांमुळे ती अहिल्यादेवी व तिच्या कुटुंबीयांना आवडली असल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी कमी कालावधीत सर्वांच्या मनात स्थान मिळवले आणि त्यानंतर तिने किर्लोस्कर कुटुंबाच्या घरात आदित्यची भावी पत्नी होण्याचा मान मिळवला आहे. मात्र, अनुष्का किर्लोस्कर कुटुंबाचा बदला घेण्यासाठी तेथे आली आहे. ती दिशाची बहीण असून, तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिने किर्लोस्करांच्या आयुष्यात शिरकाव केला आहे. आता समोर आलेल्या प्रोमोनुसार मालिकेत पुढे अपघात होण्याची शक्यता असल्याचे पाहायला मिळत आहे.
पारूला सत्य समजणार का?
झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, अनुष्का कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. ती विचारते, “मला सांगा की, आज नक्की गुरुजी किर्लोस्करांच्या घरी जाणार आहेत?” त्यावर तिच्याशी फोनवर बोलणारी महिला म्हणते, “हो गं.” त्यानंतर पाहायला मिळते की, आदित्यचा काका मोहन गुरुजींबरोबर गाडीतून येत आहे. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या अगदी जवळून एक गाडी गेली आहे. त्यावेळी गुरुजी व मोहन दोघेही घाबरल्याचे दिसून आले. अहिल्यादेवीला फोन आला असून, ती मोहन, असे मोठ्याने म्हणताना दिसत आहे. दुसरीकडे अनुष्का फोन ठेवताना आणि मागे वळून पाहते, तर मागे पारू उभी असल्याचे दिसते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अनुष्काचं बोलणं पारूनं ऐकलं असेल…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, पारू आदित्यच्या घरात नोकर म्हणून काम करते. तरीही त्याच्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असते. त्याशिवाय ती आदित्यची अत्यंत चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे बऱ्याचदा जिथे आदित्य असेल तिथे पारूही असते. आदित्यच्या घरच्यांचादेखील पारूवर अत्यंत विश्वास आहे. आता अनुष्काच्या येण्यामुळे सर्वांच्या नात्यातील समीकरणे बदलताना दिसत आहेत.
आता अनुष्का नेमके फोनवर काय बोलत होती, मोहन व गुरुजींच्या गाडीचा अपघात होणार का, पारूने अनुष्काचे बोलणे ऐकले असेल का, या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.