‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत सध्या तेजू व समीरच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नाची तारीख जवळ आली असून, त्याआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे; ज्यामध्ये समीर व तेजूच्या लग्नाचा दिवस उजाडला असल्याचे दिसत आहे. डॅडींचा प्लॅन सूर्याला समजणार की काय, असा प्रश्न हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
समीरचा निर्धार डॅडींचा प्लॅन उघड करणार का?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, लग्नाच्या हॉलजवळ तेजूचा होणारा नवरा म्हणजेच समीर गाडीतून येतो. त्याच्या स्वागताला सूर्याचे संपूर्ण कुटुंब हजर आहे. तो गाडीतून उतरल्यानंतर सूर्याच्या बहिणी त्याचं औक्षण करून स्वागत करतात. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, शत्रू सूर्याला म्हणतो, “एक प्रॉब्लेम झाला होता.” सूर्या म्हणतो, काय झालं होतं? शत्रू सांगतो, “आपले जे गुरुजी आहेत ना, त्यांचा अपघात झालाय.” त्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर सूर्याच्या मामांची मुलगी विचारते, “मग आता लग्न कोण लावणार?” शत्रू त्यांना म्हणतो, “दुसऱ्या गुरुजींची सोय केलेली आहे. ते लावतील.” त्याचे हे बोलणे ऐकून सर्वांना दिलासा मिळतो.
पुढे पाहायला मिळते की, डॅडी व शत्रू समीरजवळ येतात आणि त्याला पैसे देतात. शत्रू त्याला म्हणतो, “हे घे. बाहेर गाडी लावलीय. कोणाला कळू न देता गाडीत जाऊन बसायचं”, एवढं बोलून शत्रू व डॅडी निघून जातात. मात्र, समीरला वाईट वाटत असल्याचे दिसत आहे. तो स्वत:शीच म्हणतो, “या साध्या लोकांना फसवायचं म्हणजे मला पाप लागणार आहे. आज काहीही झालं तरी मी सूर्याला खरं सांगणार.” पुढे पाहायला मिळत आहे की, समीर सूर्याबरोबर बोलत आहे. तो त्याला म्हणतो, “हे बघा दादा, मला खरं तर कळंना झालंय तुम्हाला हे कसं सांगू?” सूर्या म्हणतो, “म्हणजे?” समीर म्हणतो, “कदाचित मी तुम्हाला हे सांगितल्यानंतर वाईट वाटू शकतं.”
तेजूचे लग्न शत्रूबरोबर लावून देण्यासाठी डॅडींनी हा प्लॅन केला आहे. त्यासाठी त्यांनी पिंट्या ऊर्फ समीर निकमची पॅरोलवर सुटका केली होती. तेजूबरोबर समीरचे लग्न ठरवायचे; पण ऐन लग्नातून समीरने गायब व्हायचे. म्हणजे त्याच्या जागी शत्रू तेजूबरोबर लग्न करणार, असा हा प्लॅन आहे.
हेही वाचा: तुमच्या मते देव म्हणजे काय? नाना पाटेकरांनी म्हटले…
आता समीर सत्य सूर्याला सांगू शकणार का, तेजूचे लग्न शत्रूबरोबर होणार का, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.