काही मालिका या वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या बनतात. अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ‘पारू’ (Paaru) या मालिकेची ओळख आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ही मालिका प्रेक्षकांची आवडती असल्याचे पाहायला मिळते. श्रीमंत असलेल्या किर्लोस्करांच्या घरात मारूती नावाचा व्यक्ती वर्षानुवर्षे काम करतो. या घराचे प्रमुख असलेले अहिल्यादेवी किर्लोस्कर व श्रीकांत किर्लोस्कर हे त्यांच्या नोकरांना चांगली वागणूक देतात, वेळोवेळी मदत करतात, त्यामुळे मारूतीला या कुटुंबाविषयी आदर वाटतो. याबरोबरच त्यांचे सर्व चांगले व्हावे असेही त्याला वाटते.
मारूतीची मुलगी पारू हीसुद्धा किर्लोस्करांच्या घरी काम करते. तिला अहिल्यादेवी किर्लोस्करांविषयी मोठा आदर वाटतो. तो इतका की ती तिला देवी मानते. या सगळ्याबरोबरच, पारू किर्लोस्करांच्या एका प्रॉडक्टची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. याच प्रॉडक्टच्या एका जाहिरातीच्या शूटिंगदम्यान अहिल्यादेवीचा मोठा मुलगा आदित्यने पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. आदित्यसाठी ते एक फक्त शूटिंग होते, मात्र पारू या सगळ्याला खरे मानते. तेव्हापासून पारू आदित्यला नवरा मानते. किर्लोस्करांच्या घरची मोठी सून म्हणून ती तिची सर्व कर्तव्ये पार पाडते. या सगळ्याबद्दल फक्त सावित्रीला माहित आहे. इतर सर्व जण आदित्य व पारूच्या नात्याकडे खूप चांगली मैत्री असेच पाहतात.
पारूचे सत्य श्रीकांतसमोर येणार का?
आता झी मराठी वाहिनीने पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला सावित्री आत्या पारूला सांगते की, मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरची सून ही पूजा करते, तुलासुद्धा ही पूजा करावी लागेल. सावित्रीचे बोलणे झाल्यावर किर्लोस्करांच्या घरी पूजा केली जात आहे. ही पूजा अनुष्का करत आहे. त्यानंतर पारू किचनमध्ये देवीची पूजा मांडते. तिची पूजा होत असते तेवढ्यात तिथे श्रीकांत येतात. सावित्री त्यांना पाहते व ती पारू असे घाबरलेल्या आवाजात म्हणते. त्यानंतर पारू श्रीकांत यांच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत असल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे.
पारू मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “पारूच्या या पूजेमागचं सत्य श्रीकांतसमोर येणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच अनुष्का किर्लोस्कर कुटुंबीयांच्या आयुष्यात आली आहे. तिने अगदी कमी कालावधीत या कुटुंबाचे मन जिंकले आहे. तिच्या वागण्या-बोलण्यावर या कुटुंबातील सर्वच सदस्य खूश असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आदित्यची पत्नी होण्यासाठी सर्वांनी अनुष्काला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. आदित्यच्या वाढदिवसाला अनुष्कानेदेखील तिच्या मनातील भावना त्याच्याजवळ व्यक्त केल्या आहेत. मात्र, अनुष्का ही दिशाची बहीण आहे, जी पैशांसाठी प्रीतमबरोबर लग्न करत होती. तिचे सत्य समोर आल्यानंतर अहिल्यादेवीने तिला तुरुंगात पाठवले आहे. आता अनुष्का तिच्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या आयुष्यात आली आहे.
दरम्यान, आता पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतला समजणार का? मालिकेत पुढे काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.