‘सावळ्याची जणू सावली’ (Savlyachi Janu Savli) या मालिकेत सध्या सतत ट्विस्ट येताना दिसत आहेत. सध्या मालिकेत लग्नविशेष कार्यक्रम पाहायला मिळत आहे. नुकताच हळदीचा कार्यक्रम पार पडला असून, आता संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मात्र, या संगीत सोहळ्यात तारा आणि भैरवीचे सत्य सर्वांसमोर येणार असल्याच्या शक्यता निर्माण झाल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार का?

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला सारंगचा संगीत सोहळा आहे. सर्व जण तिथे जमलेले आहेत. जगन्नाथ आणि त्यांची पत्नीदेखील तिथे उपस्थित आहे. जगन्नाथ यांची पत्नी त्यांना म्हणते, “या अस्मीचे सत्य तर आपल्याला समजले आहेच; पण या तारा आणि भैरवीचे सत्य पुराव्यानिशी सिद्ध करण्याची संधी आपण सोडायची नाही.”

या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आता गाणार आहे तारा वझे, अशी कोणीतरी घोषणा करते. तारा स्टेजवर माइकसमोर उभी असलेली दिसते. भैरवी तिला शुभेच्छा देते. गाणे सुरू होते. स्टेजवर तारा, तर स्टेजमागे सावली गात असल्याचे दिसते. खरे तर सावली गाणे गाते आणि तारा त्यावर गात असल्याचा अभिनय करते. लोकांना वाटते की, तो आवाज ताराचा आहे. याचदरम्यान जगन्नाथ वरच्या मजल्यावर जातात. तिथे त्यांना स्टेजवरची तारा आणि पडद्यामागे सावली असल्याचे दिसते. ते फोनमध्ये हा व्हिडीओ काढतात.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘तारा आणि भैरवीचा प्लॅन सगळ्यांसमोर उघड होईल का?’, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, भैरवी ही अत्यंत नावाजलेली गायिका आहे; मात्र तिच्या मुलीला ताराला गाता येत नाही. याउलट गरीब घरात जन्मलेल्या आणि लहान भावाच्या उपचारांसाठी पैशांची गरज असलेल्या सावलीला उत्तम गाता येते. याचाच फायदा घेत भैरवी तारासाठी सावलीला गायला भाग पाडते. त्यासाठी ती तिला पैसे देते; मात्र योग्य वागणूक देत नाही. लोकांना ताराचा आवाज आवडतो. तिचे गाण्याचे मोठमोठे कार्यक्रमही होतात. तिच्या गाण्याचे कौतुक केले जाते. मात्र, खरे तर तो आवाज सावलीचा असतो. आता हेच सत्य बाहेर आणण्यासाठी जगन्नाथ प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. याबरोबरच सारंग आणि सावलीचे लग्न व्हावे यासाठीसुद्धा ते प्रयत्न करताना दिसतात.

हेही वाचा : पतीचं स्वप्न अन् मृणालची खंबीर साथ! अमेरिकेहून भारतात आल्यावर रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय का घेतला? अभिनेत्री म्हणाली…

आता जगन्नाथकडे पुरावा तर आहे; मात्र तो सगळ्यांसमोर आणणार का, अस्मी आणि सारंगचे लग्न मोडणार का, मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will tara and bhairavis plan be revealed to everyone twist in savlyachi janu savli watch promo nsp