भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा नेहमीच त्यांची मतं स्पष्टपणे मांडत असतो. अनेकदा त्याच्या वक्तव्यांवरून त्याला ट्रोल केलं जातं. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत गौतम समालोचक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. समालोचन करताना तो अनेकदा विराट कोहलीबाबत अप्रत्यक्षपणे भाष्य करतो. गंभीरच्या टीकात्मक वक्तव्यांमुळे विराटचे चाहते दुखावले जातात आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरूवात होते.
सध्या विराट कोहलीवर अप्रत्यक्ष टीका करणारे गौतम गंभीरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गंभीरने, “रोहित शर्माने वैयक्तिक विक्रमांचा विचार केला असता, तर त्याला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ३-४ शतकं झळकावली असती.” असं वक्तव्य मध्यंतरी केलं होतं. तसेच “ब्रॉडकास्ट वाहिन्यांनी संघातील इतर खेळाडूंवर सुद्धा लक्ष केंद्रित करावं”, असं त्याने नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलं आहे.
गौतम गंभीर विराट कोहलीबद्दल अप्रत्यक्षपणे भाष्य करत असल्याने एका मराठी अभिनेत्याने यासंदर्भात सूचक पोस्ट शेअर करत गंभीरला टोला लगावला आहे. “हा गंभीर विराट कोहलीची सासू असल्यासारखा वागतो…सरळ कौतुक नाहीच #वर्ल्डकप२०२३” अशी पोस्ट ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ फेम अभिनेता गौरव मालनकरने केली आहे.
हेही वाचा : “…म्हणून मी माझे चित्रपट बघत नाही”; ‘कॉफी विथ करण’मध्ये करीनाचा मोठा खुलासा, म्हणाली
गौरव मालनकर क्रिकेटचा मोठा चाहता आहे. सध्या तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. यापूर्वी त्याने ‘फुलपाखरू’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याने गंभीरबद्दल केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल सांगायचं झालं, तर सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा तब्बल ७० धावांनी पराभव करत टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.