Shireen Mirza Announced Pregnancy: ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये हैं मोहब्बते’ मालिका चांगलीच गाजली होती. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता करण पटेल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने सहा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. इशिता अय्यर आणि रमन भल्लाची प्रेमकथा प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळे या मालिकेचे वेगवेगळ्या भाषांमध्ये रिमेक झाले. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ‘ये हैं मोहब्बते’चा रिमेक आहे. ‘ये हैं मोहब्बते’ मालिकेतील एक अभिनेत्री सध्या खूप चर्चेत आली आहे. कारण या अभिनेत्रीने नुकतीच गुडन्यूज दिली आहे.

‘ये हैं मोहब्बते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिरीन मिर्झाने गुडन्यूज दिली आहे. सध्या मालिकाविश्वापासून दूर असलेली शिरीन लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने पती हसन सरताजबरोबरचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यामुळे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

शिरीनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, ती पती हसनबरोबर एका शेतात पाहायला मिळत आहे. दोघांनी काळ्या रंगाचे आउटफिट घातले आहेत. याच वेळी शिरीन बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तसंच शिरीन सोनोग्राफी दाखवत पतीबरोबर पोज देताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं, “आमच्या प्रार्थने दरम्यान, अल्लाहने आमचे ऐकले आणि योग्यवेळी त्याने आम्हाला आशीर्वाद दिला. लवकरच आमचं छोटसं बाळ घरी येणार आहे. पालक म्हणून या नवीन अध्यायला सुरू करताना आम्ही सतत प्रार्थना करत आहोत. हे अल्लाह, आमच्या मुलाचं रक्षण कर आणि तुझ्या प्रेमात, प्रकाशात त्याला मोठं होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर. आम्ही यासाठी खूप उत्सुक आहोत. आमचं अंतःकरणं भरून आलं आहे.”

दरम्यान, शिरीन मिर्झाने हसन सरताजबरोबर साडे तीन वर्षांपूर्वी २३ ऑक्टोबर २०२१ला लग्न केलं होतं. कुटुंबाच्या आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थित दोघांचं लग्न झालं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिरीनच्या लग्नाला ‘ये हैं मोहब्बते’ मालिकेतील अनेक कलाकारांनी खास हजेरी लावली होती.