‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘येड लागलं प्रेमाचं’. अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसंच पूजाने साकारलेली मंजिरी आणि विशालने साकारलेला राया आता घराघरात पोहोचले आहेत. आज राया म्हणजेच अभिनेता विशाल निकमचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मंजिरीने म्हणजेच पूजा बिरारीने खास पोस्ट लिहिली आहे.
अभिनेता विशाल निकमच्या वाढदिवसानिमित्ताने इतर कलाकार मंडळींसह चाहते सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील कलाकारांनी विशालला शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. तसंच अभिनेत्री पूजा बिरारीने नुकताच एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत विशालला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पूजा बिरारीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “मी भाग्यवान आहे की एका उत्तम सहकलाकारात मला एक चांगला मित्र सापडला. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…अनेक दिवस ड्राफ्ट मधली पेंडिंग रील आज फायनली पोस्ट करता आली याचा तुला आनंद देणं हेच माझं तुला वाढदिवसाचं गिफ्ट आहे.”
“बाकी ‘तू टेन्शन घेऊ नको – में टेन्शन लेताही नहीं’ हे चालुच राहिल आणि हो पुढच्या वेळी जेव्हा सांगवीला येशील तेव्हा तुला जेवणासाठी नक्कीच आमंत्रित करेन. राया-मंजिरी ऑनस्क्रीन विरोधी ऑफस्क्रीनवरील मजा,” असं पूजा बिरारीने लिहिलं आहे.
पूजाच्या या पोस्टवर विशाल निकमने प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले आहेत. विशालने लिहिलं, “पूजा तुझे खूप खूप आभार. मी ही खूप भाग्यवान आहे, तुझ्यासारखी उत्तम कलाकार आणि तितकंच भारी व्यक्तिमत्व असणारी सहकलाकार आणि मैत्रीण मिळाली. हां, टेन्शन कधी घेणार नाही. तसंच जेवायला तू बोलावलं नाही तरीही मी येणार आहे.” याशिवाय पूजाच्या पोस्टवर चाहत्यांनी विशाल निकमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.