Yed Lagla Premacha Marathi Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २७ मे रोजी ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या माध्यमातून ‘बिग बॉस मराठी’ शोचा विजेता अभिनेता विशाल निकम आणि ‘स्वाभिमान’ फेम अभिनेत्री पूजा बिरारी यांची फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर झळकत आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका नेहमी टॉप ६ मध्ये असते. यामध्ये विशाल व पूजा यांच्यासह अभिनेता जय दुधाणे देखील महत्त्वाची भूमिका साकारत होता. परंतु, काही कारणास्तव त्याने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता जय दुधाणे या मालिकेत इन्सपेक्टर घोरपडे हे पात्र साकारत होता. परंतु, वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींमुळे अभिनेत्याने अवघ्या दोन महिन्यांतच ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जयने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर झाली मायलेकींची भेट! सुभेदारांच्या घरात प्रतिमाची एन्ट्री, मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

जय दुधाणेची पोस्ट

जय पोस्ट शेअर करत लिहितो, “नमस्कार…गेल्या महिन्यात माझ्या वडिलांचं निधन झालं. हा माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी सर्वात मोठा धक्का होता… त्यांच्या जाण्याने आमचं खूप नुकसान झालं आहे. याशिवाय अनेक वैयक्तिक कारणांमुळे मी ‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेचा निरोप घेत आहे.”

“स्टार प्रवाह वाहिनी व मालिकेतील कलाकारांबरोबर काम करून प्रचंड आनंद मिळाला. तुम्ही सगळे या मालिकेवर कायम प्रेम करत राहा. संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा…मला ही संधी दिल्याबद्दल मालिकेच्या निर्मात्यांचे व वाहिनीचे खूप आभार” अशी पोस्ट शेअर करत जय दुधाणेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जय दुधाणेची पोस्ट ( Yed Lagla Premacha )

हेही वाचा : “‘हिंदुत्वाची गोष्ट’ सांगणाऱ्या सिनेमाच्या प्रमोशनला ‘द सलमान खान’ हा अस्सल पठाण…”, किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “हा घ्या ढळढळीत पुरावा”

( Yed Lagla Premacha )

हेही वाचा : Dilip Kumar : दिलीप कुमार यांच्या बंगल्याचा ‘इतक्या’ कोटींना सौदा, स्क्वेअर फूटसाठी १ लाख ६२ हजारांचा भाव

दरम्यान, जय दुधाणेने मालिकेतून एक्झिट घेतल्यावर आता ‘येड लागलं प्रेमाचं’ ( Yed Lagla Premacha ) या मालिकेत अभिनेता संग्राम साळवीची एन्ट्री झाली आहे. संग्रामने यापूर्वी स्टार प्रवाहच्या ‘देवयानी’ व ‘कुलस्वामिनी’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. आता ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेच्या निमित्ताने संग्राम तब्बल ६ वर्षांनी स्टार प्रवाहवर परतला आहे.

“‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मी साकारत असलेलं पात्र काहीसं हटके आहे. खलनायक साकारतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खलनायक साकारताना एक कलाकार म्हणून नेहमी कस लागतो. भूमिकेतील बरेच बारकावे हळूहळू आत्मसात करतोय. मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद अन् प्रेम या पात्रालाही मिळो हीच इच्छा व्यक्त करेन.” असं मत संग्रामने व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yed lagla premacha this marathi actor exit from the serial shared post on instagram sva 00