Mohsin Khan Suffered Heart Attack: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये कार्तिक ही भूमिका साकारून अभिनेता मोहसीन खानला खूप लोकप्रियता मिळाली. मोहसीनने आता मोठा खुलासा केला आहे. त्याला गेल्या वर्षी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता, असं या ३२ वर्षीय अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. यानंतर तो जवळजवळ एक वर्ष आजारी होता असंही त्याने नमूद केलं.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानला काही दिवसांपूर्वीच कर्करोगाचे निदान झाले. अभिनेत्रीवर सध्या उपचार सुरू आहे. अशातच या शोच्या दुसऱ्या अभिनेत्याने आपल्या प्रकृतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. मोहसीन खानला गेल्या वर्षी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता, पण त्याने याबद्दल कोणालाच सांगितलं नाही, असं म्हटलंय.
रुग्णालयात दाखल होता मोहसीन
मोहसीन खानने ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत हृदयविकाराच्या झटक्याबद्दल माहिती दिली आहे. मोहसीन म्हणाला की तो आता पूर्णपणे बरा आहे, पण जेव्हा त्याची प्रकृती बिघडली तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला होता. “मला फॅटी लिव्हर झाले होते, त्यामुळेच गेल्या वर्षी मला हृदयविकाराचा सौम्य झटका आला, पण मी कुणालाच त्याबद्दल सांगितलं नाही. मी काही दिवस रुग्णालयात दाखल होतो, उपचार झाले, मी २-३ हॉस्पिटल बदलले, पण आता सगळं ठिक आहे,” असं मोहसीन म्हणाला.
मोहसीनला फॅटी लिव्हर कशामुळे झाले?
प्रकृती बिघडल्याने रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम झाला होता आणि तो वारंवार आजारी पडत होता, असंही अभिनेत्याने सांगितलं. फॅटी लिव्हरची समस्या कशी झाली, विचारल्यावर मोहसीन म्हणाला, “मला माहीत नाही. पण याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात, दारू न पिताही तुम्हाला फॅटी लिव्हर होऊ शकते. कदाचित झोपेमुळे झालं असावं.”
कुठे आहे ‘मोहरा’तील ही अभिनेत्री? १८ वर्षांनी साध्वीच्या रुपात दिसली अन्…; आता करते ‘हे’ काम
मोहसिन खानने शोमध्ये कार्तिकची भूमिका साकारली होती. शिवांगी जोशीबरोबर (Shivangi Joshi) तो मुख्य भूमिकेत होता. शिवांगीने शोमध्ये नायरा नावाचे पात्र केले होते. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. मोहसीन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो, पण त्याने हृदविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती कुणालाच दिली नव्हती.
© IE Online Media Services (P) Ltd