Yogita Chavan Dance Video: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहोचली आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री योगिता चव्हाण नेहमी चर्चेत असते. जितका तिच्या अभिनयाचा चाहता वर्ग आहे, तितकाच आता तिच्या डान्सचा चाहता वर्ग तयार झाला आहे. आजकाल तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं असतात. असाच एक नवीन भन्नाट डान्स व्हिडीओ तिने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या चर्चेत आला आहे.
अभिनेत्री योगिता चव्हाणने फुलांचे इमोजी कॅप्शनमध्ये देऊन नवा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती करीना कपूर आणि तुषार कपूरचा ‘मुझे कुछ कहना है’ चित्रपटातील गाणं ‘आ रंग दे दुपट्टा मेरा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पुन्हा एकदा तिच्या भन्नाट डान्स आणि हावभावने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
योगिता चव्हाणचा हा डान्स व्हिडीओ पाहून अनेकांनी कौतुक केलं, तर काहींनी खोचक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “एकच नंबर…एकदम कडक डान्स”, “वाव किती सुंदर”, “कडक”, “खूप छान ताई”, “खतरनाक”, “ओढणी ( दुपट्टा ) रंगवायला दिली वाटतं”, “काय तेच तेच”, “अगोदर ओढणी घे”, “हा काय खुळेपणा आहे”, “ओढणी कुठे आहे?” अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया योगिताच्या डान्स व्हिडीओवर उमटल्या आहेत.
योगिता चव्हाणबद्दल बोलायचं झालं तर, ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील तिने साकारलेली अंतराची भूमिका खूप गाजली. ही मालिका बंद झाल्यानंतर काही महिन्यांनी ‘जीव माझा गुंतला’ मधील मल्हार म्हणजे अभिनेता सौरभ चौघुलेशी योगिता लग्नबंधनात अडकली. ३ मार्च २०२४ ला योगिता व सौरभचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. दोघांच्या लग्नाला यंदा एक वर्ष पूर्ण झालं असून यानिमित्ताने मार्चमध्ये योगिता व सौरभ बालीला फिरायला गेले होते. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
दरम्यान, करीना कपूर आणि तुषार कपूरचा ‘मुझे कुछ कहना है’ चित्रपट २५ मे २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुषार कपूरचा पहिला-वहिला चित्रपट होता. तेलुगूचा ‘थोली प्रेमा’ या चित्रपटाचा ‘मुझे कुछ कहना है’ रीमेक होता. या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली होती. ‘इस प्यार को मैं क्या नाम दूँ’, ‘प्यार रे दिल मांगे प्यार रे’, ‘गुंचा है गुल है’, ‘आ रंग दे दुपट्टा मेरा’, ‘मुझे कुछ कहना है’ या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आजही अनेकजण तितक्याच आवडीने ही गाणी ऐकतात.