स्टँडअप कॉमेडीचा आजकाल चांगलाच सुळसुळाट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच काही स्टँड अप कॉमेडीयनमुळे निर्माण होणारे वाद तर अगदी नेहमीचे झाले आहेत. तरी या सगळ्यामध्ये एक कॉमेडीयन असा आहे जो आजवर कधीच कोणत्या वादात अडकला नाही. तो कॉमेडीयन म्हणजे झाकीर खान. कॉलेज ड्रॉप आऊट असलेल्या झाकीरने या क्षेत्रात स्वतःचा ब्रँड तयार केला आहे.
नुकतंच झाकीरने ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली आणि कलाकार तसेच प्रेक्षकांसह भरपूर धमाल केली. या कार्यक्रमात झाकीरसह कुशा कपिला, अभिषेक उपमन्यु, अनुभव सिंह बस्सी अशा काही स्टँडअप कॉमेडीयन्सनीसुद्धा हजेरी लावली. या सगळ्यांबरोबर धमाल गप्पा मारताना झाकीरने त्याच्या स्ट्रगलच्या दिवसातील काही किस्से सांगितले.
आणखी वाचा : “मी दिवसरात्र मृत्यूची वाट बघायचो…” हनी सिंगने शेअर केला मानसिक आजारादरम्यानचा भयावह अनुभव
झाकीरला एकदा एका कार्यक्रमात मंचावरुन खाली बोलावण्यात आलं होतं. त्याचा तेव्हा चांगलाच पाणउतारा झाला होता. याविषयी बोलताना झाकीर म्हणाला, “जेव्हा पहिल्यांदा मी स्टेजवर परफॉर्म करत होतो तेव्हा २ मिनिटांमध्येच मला थांबवून खाली बोलावण्यात आलं. मित्र, कुटुंबासमोर कॉमेडी करणं सोप्पं आहे. पण जेव्हा अनोळखी लोक समोर असतात तेव्हा त्यांना हसवणं हे सर्वात कठीण असतं. लोकांना गोष्टी सांगणं आणि त्याचवेळी त्यांना हसवणं हे वाटतं तितकं सोप्पं काम नाही.”
असे झाकीरने बरेच किस्से सांगितले आणि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. झाकीर खानचा नुकताच ‘तथास्तू’ हा कॉमेडी शो प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या शोला लोकांनी चांगलीच पसंती दर्शवली. याबरोबर झाकीर आणखी दोन वेगळे शो लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.