Suraj Chavan & Nikki Tamboli : सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी या भावा-बहिणींची जोडी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे घराघरांत लोकप्रिय झाली होती. शो सुरू असताना दोघांमध्ये बऱ्याचदा खटके उडाले होते. पण, शोच्या अखेरिस निक्की सूरजला सांभाळून घेत तिचा खेळ खेळताना दिसली होती. याशिवाय निक्कीच्या आई-बाबांनी देखील सूरजची क्रेझ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे असं आपल्या लेकीला सांगितलं होतं.
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपल्यावर शोमधल्या अनेक स्पर्धकांनी एकमेकांची भेट घेतली होती. काहीजण सूरजच्या गावी जाऊन त्याला भेटले होते. तर, या सगळ्या स्पर्धकांचं रियुनियन प्रेक्षकांना अंकिता वालावलकरच्या लग्नसोहळ्यात देखील पाहायला मिळालं होतं. पण, शो संपल्यापासून निक्की तांबोळी ही अरबाज वगळता कोणाच्याही संपर्कात नव्हती.
आता सूरजचा पहिला सिनेमा प्रदर्शित होण्याआधी निक्की-सूरज एकमेकांची भेट घेतील का? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सूरजने लाडक्या निक्की ताईच्या घरी जाऊन तिची भेट घेतली आहे. या भेटीमागचं कारण आहे त्याचा हिरो म्हणून पहिला सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होतोय ज्याचं नाव आहे ‘झापुक झुपूक’.
‘झापुक झुपूक’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सूरजने वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर या सगळ्यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. ‘गुलीगत किंग’ने सर्वांच्या घरी जाऊन पहिल्या सिनेमासाठी आशीर्वाद घेतले. आता नुकताच सूरज निक्की तांबोळीच्या घरी पोहोचला होता. याचा खास फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
निक्की लिहिते, “वेलकम होम सूरज चव्हाण… ‘झापुक झुपूक’ सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होतोय…प्लीज सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा.” निक्कीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे आई-बाबाही दिसत आहेत. त्या दोघांनीही सूरजला त्याच्या पहिल्या सिनेमासाठी आशीर्वाद दिले आहेत.
सूरज म्हणतो, “काल खूप दिवसांनी आमच्या ‘बिगबॉस’च्या घरातल्या शेरनीला, माझ्या बहिणीला निक्कीला भेटलो. तिला भेटून खूप आनंद झाला, ती पण खूप जास्त खूश झाली. निक्कीसह तिचे आई-बाबा, लिली अन् क्रिस्टीला ( तिच्या खरेच पाळीव प्राणी ) पण भेटलो. खूप एन्जॉय केलं, पोटभर जेवलो…डान्स पण केलाय फुल्ल टू खाऊन गुलीगत व्हू…! निक्की, आई-बाबा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम राहूद्या… तुम्हाला कायम आनंद होईल असंच काम मी करत राहाणार. लवकरच परत येतो भेटायला.”

दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होणार असून, यामध्ये सूरजसह इंद्रनील कामत, जुई भागवत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.