मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्याचं प्रक्षेपण लवकरच ‘झी मराठी वाहिनी’वर करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी या सोहळ्याला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने खास उपस्थिती लावली होती.
शिल्पा शेट्टीने ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोळ्याला उपस्थिती लावल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुरस्कार सोहळ्यात शिल्पाचा पिस्ता रंगाची पैठणी साडी, गळ्यात मोत्याचा हार, नाकात नथ असा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. ‘झी मराठी’सह अनेक पापाराझी पेजवरून तिच्या लूकचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये शिल्पा अतिशय सुंदर दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : “‘पठाण’मुळे आर्थिक संकट दूर झालं”, राणी मुखर्जीच्या पतीचे सगळे चित्रपट झालेले फ्लॉप, अनुभव सांगत म्हणाली…
शिल्पाने केवळ मराठमोळा लूकच नव्हे तर पापाराझींशी मराठी भाषेत संवाद देखील साधला. अभिनेत्रीला अनेकांनी “पैठणी खूप सुंदर आहे”, “नाकातील नथ छान वाटतेय” अशा प्रतिक्रिया दिल्या. यावर शिल्पाने सर्वांना मराठीत उत्तरं दिली. “बघा साडी पण सुंदर आहे ना?” असे प्रश्न विचारत तिने पापाराझींशी मराठीत संवाद साधला.
दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या मराठमोळ्या लूकचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. लवकरच ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याचं वाहिनीवर प्रक्षेपण केलं जाणार आहे. सध्या कोण-कोणत्या कलाकारांना पुरस्कार मिळाले याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.