‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ८ मार्चला रात्री ७ वाजता हा पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे. यंदा ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यातील सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख आणि अमेय वाघने सांभाळली आहे. सध्या या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सातारच्या जिनिलीयाचा व्हिडीओ.

हो, ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’च्या सोहळ्यात सातारच्या जिनिलीयाची एन्ट्री झाली. या जिनिलीयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात जिनिलीया देशमुख वेगवेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाली होती. त्यापैकीच एक लूक करून सातारची जिनिलीया ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात उपस्थित राहिली होती. ही सातारची जिनिलीया दुसरी-तिसरी कोण नसून वेदांती भोसले आहे. वेदांती जिनिलीयासारखा हुबेहूब लूक करून रितेश देशमुखबरोबर उखाणा घेताना आणि डान्स करताना पाहायला मिळाली. याचा व्हिडीओ ‘मराठी मंनोरजन विश्व’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये सातारची जिनिलीया सुरुवातीला रितेश देशमुखला म्हणतेय की, तुम्ही मोठी जिनिलीया मिळाली, म्हणून या छोट्या जिनिलीयाला विसरलात का? त्यानंतर अमेय वाघ विचारतो, “तुम्ही पण जिनिलीया देशमुख आहात?” तर वेदांती म्हणते, “होय. मी सातारची जिनिलीया. तुम्ही या सातारला. मस्त रानात मटणाची पार्टी करू.” तेव्हा रितेश म्हणतो की, मी मटण खात नाही. नंतर छोटी जिनिलीया म्हणते, “तुमच्यासाठी पिझ्झाची पार्टी आणि उसाचा रस.” त्यावर अमेय वाघ म्हणतो, “जिनिलीयाजी हे सगळं तुम्हीच ठरवलं.” यावर छोटी जिनिलीया म्हणते, “जिनिलीया कुठलीही असो. सगळं तिचं ठरवते. हो ना रितेश सर?” हे ऐकताच सोहळ्यात हशा पिकतो.

त्यानंतर रितेश देशमुख आणि छोटी जिनिलीया उखाणा घेताना दिसत आहेत. रितेश जबरदस्त उखाणा घेत म्हणतो की, त्या जिनिलीया समोर असतो मी नेहमी म्युट. पण ही जिनिलीया पाहून वाटतं सो क्यूट. मग छोटी जिनिलीया उखाणा घेत म्हणते, “सगळे म्हणतात ही लय आगाऊ आहे कार्टी, रितेश रावाचं नाव घेते, चला रानात करू पिझ्झाची पार्टी.”

पुढे रितेश आणि छोट्या जिनिलीयाचा डान्स पाहायला मिळत आहे. दोघांनी ‘पांडू’ चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘बुरुम बुरुम’वर डान्स केला आहे. रितेश आणि छोट्या जिनिलीयाचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला असून व्हायरल झाला आहे.

दरम्यान, वेदांती भोसले ‘झी मराठी’चा ‘ड्रामा ज्युनिअर’ कार्यक्रमात झळकली होती. यावेळी तिने आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली होती. वेदांतीचे गणेश केंद्रेबरोबरचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात.

Story img Loader