Riteish Deshmukh : ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. मराठी सिनेविश्वात गतवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा, तंत्रज्ञांचा या सोहळ्यात सन्मान केला जातो. यंदा या सोहळ्याचं २५ वं वर्ष होतं. यानिमित्ताने अभिनेता रितेश देशमुख व अमेय वाघ यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. तर, पंचविसावं वर्ष असल्याने यावर्षी सोहळ्याला अशोक व निवेदिता सराफ, सचिन व सुप्रिया पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, भरत जाधव अशा दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
रितेश देशमुखने मराठमोळ्या स्टाइलने ग्रँड एन्ट्री घेत या कार्यक्रमाच्या होस्टिंगला सुरुवात केली. अमेय व रितेश यांची हटके जुगलबंदी या कार्यक्रमात प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. बॉलीवूडसह मराठी कलाविश्व गाजवणाऱ्या रितेश देशमुखने ‘झी चित्र गौरव’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी अवॉर्ड शो होस्ट केला असं अमेयने यावेळी सांगितलं.
यानंतर पुढे, रितेश-अमेयमध्ये एक मजेशीर संवाद झाला. अमेयने रितेशला “जिनिलीया वहिनींना पुरणपोळी बनवता येते का?” असा प्रश्न विचारला. यावर रितेशने असं काही उत्तर दिलं की, भर कार्यक्रमात एकच हशा पिकला.
रितेश देशमुख व अमेय वाघ यांच्यातील मजेशीर संवाद
रितेश देशमुख – ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा म्हणजे कलाकार आणि रसिकांसाठी दिवाळीच नाही का?
अमेय वाघ – दिवाळीवरून मला सहज आठवलं…आपल्याकडे कोणत्याही सणाला पुरणपोळ्या करतात. जिनिलीया वहिनींना पुरणपोळी बनवता येते का?
रितेश देशमुख – दोन-दोन पुरणपोळ्या खातात त्या…
अमेय वाघ – अहो…तसं नाही पुरणपोळी बनवता येते का त्यांना?
रितेश देशमुख – त्यासाठी त्यांनी शेफ ( स्वयंपाकी ) ठेवलाय ना…त्याचं नाव रितेश आहे. ‘बाहेर लोक ठोकतात सलाम, घरात मी जिनिलीयाचा गुलाम’
दरम्यान, रितेश व जिनिलीया यांच्याकडे कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. रितेश-जिनिलीयाला राहिल आणि रियान अशी दोन मुलं आहेत. हे जोडपं सोशल मीडियावर कायम सक्रिय असतं. त्यांच्या रील्स व्हिडीओवर चाहते लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव करत असतात.