Zee Chitra Gaurav : ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. या कार्यक्रमाला यंदा अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. याशिवाय या सोहळ्यात एक खास परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात नावाजलेला अभिनेता श्रेयस तळपदे ‘झी मराठी’च्या नायिकांबरोबर या पुरस्कार सोहळ्यात डान्स करणार आहे. श्रेयसबरोबर रंगमंचावर एकत्र परफॉर्म करण्याची संधी मिळाल्याने सध्या अक्षया देवधर, शरयू सोनावणे, वल्लरी विराज, पूर्वा शिंदे या सगळ्या नायिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील लीला म्हणजेच वल्लरी विराजच्या पुरस्कार सोहळ्यातील डान्सचा व्हिडीओ नुकताच ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. वल्लरी आणि श्रेयस या दोघांनी “कोंबडी पळाली…” या सुपरहिट गाण्यावर ठेका धरल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. “कोंबडी पळाली…” हे गाणं गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या गाण्याला यंदा २० वर्षे पूर्ण होणार आहेत. हे गाणं ‘जत्रा’ सिनेमातलं असून, या मूळ गाण्यात क्रांती रेडकर आणि भरत जाधव यांनी जबरदस्त डान्स केला होता. तेव्हापासून हळद असो, वाढदिवस असो किंवा लग्न अशा सगळ्या कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवलं जातं.

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला २५ वर्षे पूर्ण होणार असल्याने यंदा वाहिनीकडून भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लीला आणि श्रेयस यांनी ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर डान्स करताना हुबेहूब मूळ गाण्यातील भरत जाधव आणि क्रांती रेडकरसारखा लूक केला होता.

लीला आणि श्रेयस यांची हटके जुगलबंदी, कमाल एक्स्प्रेशन्स या गाण्यात पाहायला मिळतात. नेटकऱ्यांनी लीलाच्या या डान्स व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “सुपर लीला”, “क्यूट लीला”, “काय डान्स केलाय” अशा कमेंट्स या दोघांच्या डान्सवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘झी चित्र गौरव’ या भव्य सोहळ्यात प्रेक्षकांची लाडकी ‘पारू’ देखील एक परफॉर्मन्स सादर करणार आहे. या परफॉर्मन्सबद्दल बोलताना शरयू म्हणाली, “झी चित्र गौरव पुरस्काराचा हा माझा पहिला परफॉर्मन्स होता. आम्हा सर्व नायिकांचा श्रेयस सरांबरोबर डान्स होता. मी आणि श्रेयस सरांनी “ऐरणीच्या देवा तुला…” या माझ्या आवडत्या गाण्यावर परफॉर्म केलं.” हा सोहळा येत्या ८ मार्चला सायंकाळी ७ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रक्षेपित केला जाणार आहे.

Story img Loader