Zee Chitra Gaurav 2025 : मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी चित्र गौरव २०२५’ हा पुरस्कार सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला. यंदा या सोहळ्याचं २५ वं वर्ष होतं. त्यामुळे यावर्षी या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्याचं प्रक्षेपण आज ( ८ मार्च ) संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर करण्यात येणार आहे.
यंदा ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, आदित्य सरपोतदारला यावर्षी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. २०२४ मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘मुंज्या’ सिनेमाचं दिग्दर्शन आदित्यने केलं होतं.
प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वप्न असतं, चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर नवनव्या विश्वांची निर्मिती करणं आणि आदित्य सरपोतदारने हे स्वप्न आपल्या हटके आणि प्रयोगशील शैलीत अत्यंत कौशल्याने साकारलं. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी वडिलांच्या आणि अभिनय देव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पहिल्यांदाच कॅमेरा हातात धरला. पुढे, वयाच्या २३ व्या वर्षी दिग्दर्शक म्हणून आदित्यने पदार्पण केलं. मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘उलाढाल’ सिनेमा त्याने दिग्दर्शित केला होता.
‘उलाढाल’पासून सुरू झालेला हा प्रवास आता ‘मुंज्या’पर्यंत येऊन पोहोचला आहे. मधल्या काळात ‘सतरंगी रे’, ‘नारबाची वाडी’, ‘क्लासमेट’ अशा लोकप्रिय चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्याने सांभाळली होती. ‘माऊली’, ‘फास्टर फेणे’, ‘झोबिंवली’ यांसारख्या अनेक नावीन्यपूर्ण संकल्पनांनी मराठी रसिक प्रेक्षकांना त्याने थक्क करून सोडलं.
मराठीप्रमाणे आदित्यने हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्याच्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवला आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड केली. २०२४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुंज्’या चित्रपटाने तर शंभर कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. मराठी चित्रपटाला चौकटीबाहेर नेण्यासाठी झटणाऱ्या आदित्य सरपोतदारला यंदाचा ‘झी चित्र गौरव’ ‘मराठी पाऊल पडते पुढे २०२५’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान, आदित्यच्या मुंज्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, गेल्यावर्षी जून महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मराठमोळी शर्वरी वाघ यामध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती. तिच्यासह मोना सिंह, अभय वर्मा यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. कोकणातील पार्श्वभूमी आधारित असलेल्या या आगळ्या-वेगळ्या हॉरर कलाकृतीला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता.