Zee Chitra Gaurav 2025 : मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी चित्र गौरव २०२५’ हा पुरस्कार सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला. यंदा या सोहळ्याचं २५ वं वर्ष होतं. त्यामुळे यावर्षी या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा सन्मान करण्यात आला. विविध मालिका, चित्रपट, नाटक यांच्या माध्यमातून गेली वर्षानुवर्षे निवेदिता सराफ रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात त्यांनी आपल्या घराची जबाबदारी सुद्धा उत्तमप्रकारे सांभाळली. घर-संसार याकडे लक्ष देऊन त्यांनी मोठ्या जबाबदारीने आपलं करिअर सुद्धा घडवलं. या सगळ्या प्रवासात निवेदिता त्यांचे पती महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांच्या पाठीशी सुद्धा नेहमीच खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांचं चित्रपटसृष्टीतील आजवरचं योगदान, त्यांनी केलेले सिनेमे, मालिका हे सगळं लक्षात घेऊन यंदाच्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात निवेदिता सराफ यांचा खास सन्मान करण्यात आला.
करिअरबरोबर घराला सुद्धा त्याच जबाबदारीने घडवणाऱ्या या महानायिकेला यंदा ‘झी मराठी जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यानिमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने खास परफॉर्मन्स सादर करत या ज्येष्ठ अभिनेत्रीला मानवंदना दिली. निवेदिता यांच्या चित्रपटांतील लोकप्रिय गाण्यावर सोनालीने नृत्याविष्कार सादर केला. यानंतर निवेदिता यांना मंचावर आमंत्रित करण्यात आलं. त्या म्हणाल्या, “काय बोलू, मी खूप भावनिक झालीये… हा पुरस्कार खरंतर माझ्या माहेरचा पुरस्कार आहे.” यावेळी अशोक सराफ सुद्धा उपस्थित होते.
यानंतर लाडक्या मैत्रिणीच्या हस्ते निवेदिता यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुप्रिया पिळगांवकर म्हणाल्या, “माझ्यासाठी एक मैत्रीण म्हणून हा खूपच आनंदाचा दिवस आहे.” तर, “व्हेरी बिग फायटर जर कोणी असेल तर ती व्यक्ती ही आहे.” असं म्हणत सचिन पिळगांवकर यांनी निवेदिता सराफ यांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आवडत्या अभिनेत्री”, “अखेर निवेदिता ताईंना हा पुरस्कार मिळाला”, “त्या डिझर्व्ह करत होत्या”, “खूप वर्ष वाट पाहिली सुंदर क्षण” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी देखील निवेदिता यांना शुभेच्छा दिल्या आहेत.