Zee Chitra Gaurav Puraskar 2024 : मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्याचं प्रक्षेपण लवकरच ‘झी मराठी वाहिनी’वर करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व सारा अली खानने खास उपस्थिती लावली होती. सध्या या कार्यक्रमाचे अनेक प्रोमोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला ‘जीवन गौरव’ व ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे मानाचे दोन पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. तर, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्कारावर अभिनेत्री प्रिया बापटने नाव कोरलं आहे.
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना भारतीय संगीतातील आपल्या बहुमूल्य योगदानासाठी ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांनी लता मंगेशकर यांच्याबरोबर गायलेल्या ‘अपलम चपलम’ गाण्याने बॉलीवूड चित्रसृष्टीत इतिहास रचला होता. मराठीसह हिंदी, गुजराती, बंगाली, नेपाळी, मणिपुरी अशा भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. याच पार्श्वभूमीवर वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या प्रिया बापटला यंदाचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा : “अजून तुझ्या हृदयात धडधड…”, अमेय वाघची ‘ती’ कविता ऐकून श्रेयस तळपदे भावुक, पत्नीचेही डोळे पाणावले

दरम्यान, यावर्षीचा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा हा खूप अविस्मरणीय होणार आहे कारण, अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि गश्मीर महाजनी हे दोघेही या कार्यक्रमात रामायणावर आधारित एक खास सादरीकरण करणार आहेत. हा सोहळा प्रेक्षकांना १६ मार्चला सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहता येणार आहे.