‘सावळ्याची जणू सावली'(Savalyachi Janu Savali) व ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकांचा नुकताच महासंगम पाहायला मिळाला. राजश्रीच्या हर्बल हळदीसाठी सारंगच्या रूपम या कंपनीमधून तिला अपॉइंटमेंट मिळाली होती, त्यासाठी ती पुण्यात आली होती. मात्र, सारंगच्या मोठ्या भावाला गावाकडून आलेल्या मुलीबरोबर व्यवसाय करायचा नव्हता, त्यामुळे त्याने राजश्रीचा अपमान केला. तिला तुरुंगात पाठवले. सूर्या दादाने येऊन तिला सोडवले. केलेल्या अपमानासाठी तिलोत्तमाने माफी मागावी, असे सूर्याने बजावून सांगितले. या सगळ्यात सारंग व सूर्याच्या मैत्रीत तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

या सगळ्यात सावलीने राजश्रीच्या प्रॉडक्टच्या जाहिरातीत गाणे गायले. त्या जाहिरातीचा व्हिडीओ भैरवीपर्यंत पोहोचला. गाण्याचा आवाज सावलीचा असल्याचे तिने ओळखले, त्यानंतर तिचा संताप अनावर झाला, कारण सावलीचा आवाज भैरवीकडे गहाण आहे. सावली फक्त तारासाठी गाणार, दुसरीकडे कुठेही गाणार नाही, असा त्यांच्यात करार झाला आहे. त्या बदल्यात भैरवी सावलीच्या लहान भावाच्या उपचारासाठी पैसे देते. मात्र, आता सावलीने दुसरीकडे गाणे गायल्याने भैरवीचा संताप अनावर झाला आहे. ती त्याची शिक्षा सावलीला देणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आता अग्निपरीक्षा…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सावली व भैरवी एकत्र आहेत. भैरवी सावलीला मोठ्या आवाजात विचारते, “सावली, तू माझ्या परवानगीशिवाय गायलीस? चूक झाली ना तुझी? झाली की नाही?”, त्यावर सावली डोळ्यात अश्रू आणून माझी चूक झाली असे म्हणते. मात्र, तरीही भैरवी तिला म्हणते, “आता आपण तुला शिक्षा देऊयात. आजपासून तू सारंगशी बोलायचं नाहीस. आता अग्निपरीक्षा”, असे म्हणत भैरवी तिथे ठेवलेले निखारे एका चिमट्यात घेते आणि ते सावलीच्या तळहातावर ठेवते आणि तिच्या हाताची मूठ बंद करत जोरात तिचा हात दाबते. सावली वेदनेने ओरडते. भैरवी पुन्हा संतापात म्हणते, “यापुढे भैरवीला दिलेलं वचन मोडलंस तर त्याचे काय परिणाम होतील, त्याची ही झलक आहे.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “वचन मोडलं म्हणून भैरवी सावलीला देणार भयंकर शिक्षा”, अशी कॅप्शन दिली आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी संताप दर्शवला आहे. या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘का रे दुरावा’, अशा बऱ्याच छान छान मालिका होऊन गेल्या. झी मराठीचा एक वेगळा स्टँडर्ड होता; आता तसं काही दाखवत नाहीत”, “कथेची पातळी ओलांडत चालली आहे, एवढा क्रूरपणा कोणी सहन करत नसतं. शुद्ध मूर्ख स्टोरीलाईन”, “तिलाच शिक्षा द्या”, “हिचा काय संबंध? ही कोण सांगणार सारंगशी बोलायचं नाही”, “फालतू”, “सगळ्या मालिकांत असं दाखवत आहेत. हिंदी मालिकांसारखं करून टाकलं आहे. पूर्वीसारखी एकसुद्धा स्टोरी नाही, वेडेपणा चालू आहे”, “असे कार्यक्रम पाहून लोक त्यांच्या खऱ्या आयुष्यातसुद्धा असेच क्रूर कृत्य करतात. मी या मालिकेबद्दल बोलत नाही. अशा अनेक मालिका आणि चित्रपट आहेत”, “काय फालतुगिरी आहे”, “ही मालिका पाहणे बंद करावे लागेल आता”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

सावळ्याची जणू सावली मालिकेवरील कमेंट्स

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.