Zee Marathi Aabhalmaya : ‘झी मराठी’ वाहिनीवर १९९९ मध्ये ‘आभाळमाया’ ही मालिका सुरू झाली होती. यंदा ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात या मालिकेचं आणि वाहिनीचं २५ वं वर्षं साजरा करण्यात आलं. यानिमित्ताने ‘आभाळमाया’ मालिकेचे सगळे कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. यादरम्यान, या सगळ्या दिग्गज कलाकारांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
‘आभाळमाया’ ( Zee Marathi ) मालिकेतील सर्वोत्तम आणि कायम लक्षात राहणारा सीन कोणता? असा प्रश्न मंदार देवस्थळी यांना विचारण्यात आला. ‘आभाळमाया’ मालिकेच्या सोनेरी क्षणांबद्दल सांगताना दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, “आभाळमाया’चा ५३ आणि ५४ क्रमांकाचा एपिसोड आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. जो विवेक सरांनी लिहिला होता. रात्री ९ वाजता शरद जोशी घरी येतो आणि रात्री २ वाजता सुधा जोशी त्याला घराबाहेर काढते. ११ पानांचा वन सीन, वन एपिसोड होता आणि त्या संपूर्ण सीनमध्ये फक्त दोन कलाकारांच्या भूमिका होत्या. तो सीन आमच्या सर्वांच्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. तीन ते चार दिवस आधी आमच्याकडे शूटिंगचं स्क्रिप्ट आलं. शपथ सांगतो खोटं नाही बोलत… ते स्क्रिप्ट वाचून १५ मिनिटं कोणीच कोणाशी बोललं नाही. तो ‘आभाळमाया’ मालिकेचा माझ्यामते सर्वोत्कृष्ट सीन होता.”
हेही वाचा : Zee Marathi Awards 2024 – वांद्रे रेक्लेमेशनजवळ बसलेले प्रिया-उमेश; दुसऱ्या दिवशी थेट वृत्तपत्रात छापून आलेला फोटो, २५ वर्षांपूर्वीचा किस्सा ऐकून पिकला एकच हशा
रात्री दोन वाजता केलेला मनोज जोशींच्या पत्नीने कॉल
सुकन्या मोने या सीनबद्दल सांगताना म्हणाल्या, “या अशा सीन्सचा लोकांच्या मनावर खूप परिणाम होत असतो. त्या सीनचं शूटिंग सुरू असताना मनोजला कुठेतरी लग्नाला जायचं होतं. म्हणून त्यादिवशी मनोजची बायको चारू सेटवर आली होती. तिने तो संपूर्ण सीन पाहिला आणि एका क्षणात ती म्हणाली, ‘चल आपण जाऊया.’ मनोजने तिला सांगितलं, ‘हो लग्नाला जाऊया ना?’ यावर, ती म्हणाली, ‘नाही चल आपण घरी जाऊयात, लग्नाला नको जाऊयात.’ इतका तिच्या मनावर परिणाम झाला.
हेही वाचा : Zee Marathi – पाठकबाईंचं पुनरागमन! अक्षया देवधर ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार, सोबतीला असेल ‘हा’ अभिनेता
“चारूने ( मनोज जोशी यांची पत्नी ) एकदा मला रात्री दोन वाजता फोन केला होता. तिने मला विचारलं, ‘तुझं आणि मनोजचं खरंच काही नाहीये ना?’ मी तिला म्हणाले, ‘अगं असं काय करतेस चारू… आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना?’ यावर ती म्हणाली, ‘हो म्हणूनच मला टेन्शन आलं. माझी चित्रा नाईक नाही ना करणार तुम्ही?’ तिच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा इतका परिणाम झाला की… ती लग्नाला सुद्धा गेली नाही. पुढचा आठवडाभर ती त्याच विचारत होती.” असं सुकन्या मोने यांनी यावेळी सांगितलं.
© IE Online Media Services (P) Ltd