Zee Marathi Paaru Serial : ‘पारू’ मालिकेत नुकतीच अभिनेत्री श्वेता खरातची एन्ट्री झाली होती. तिच्या येण्याने आदित्य आणि पारूच्या आयुष्यात नवीन वादळ आल्याचं पाहायला मिळतंय. श्वेता या मालिकेत खलनायिका अनुष्काची भूमिका साकारत आहे. अनुष्का ही दिशाची बहीण असते. त्यामुळे आपल्या बहिणीचा बदला घेण्यासाठी अनुष्काने आदित्य किर्लोस्करच्या आयुष्यात एन्ट्री घेतलेली असते. एकीकडे अनुष्काच्या भूमिकेचा हळुवार उलगडा होत असताना आता मालिकेत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
छोट्या पडद्याचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकांचं कथानक आणखी रंजक कसं करता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. गेल्या काही महिन्यांपासून ‘पारू’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच आता कथानकात हटके ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मालिकेत नेमका कोणता अभिनेता एन्ट्री घेणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. अखेर ‘झी मराठी’ वाहिनीने या अभिनेत्याच्या एन्ट्रीचा पहिला प्रोमो शेअर करत प्रेक्षकांना सरप्राइज दिलं आहे.
‘पारू’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री
आदित्य, अनुष्का आणि पारू एकत्र बाहेर जात असताना गाडीचा टायर पंक्चर होतो. एवढ्यात अनुष्का आदित्यला विचारते, “काय झालं? तुला येतो ना टायर बदलता.” यावर आदित्य म्हणतो, “आपण याची का काळजी करतोय, आपल्याबरोबर नोकर ( पारू ) आहेच की…बदलेल ती” पुढे, अनुष्का आणि आदित्य तिथून निघून जातात.
‘पारू’ गाडीचा टायर कसा बदलायचा याच्या विचारात पडते. इतक्यात एक हॉर्न तिला ऐकू येतो. त्याच्या सायकलवर “प्रेमपुजारी आपलं कामभारी” अशी पाटी लावलेली असते. आता हा प्रेमवीर कोण आहे याचं उत्तर प्रेक्षकांना नव्या प्रोमोतून मिळालं आहे. हा प्रेमवीर दुसरा-तिसरा कोणीही नसून अभिनेता व दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा ऋग्वेद फडके आहे. ‘मुशाफिरी’ या नाटकामुळे अभिनेत्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याशिवाय तो ‘स्टार प्रवाह’च्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत छायाचा ( गायत्रीची बहीण ) नवरा विनोदची भूमिका साकारत आहे.
ऋग्वेदला या नव्या कामासाठी त्याचे सहकलाकार आणि मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता हा प्रेमवीर ‘पारू’ची अडचण कशी सोडवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd