Zee Marathi Serial Tula Shikvin Changalach Dhada : ‘झी मराठी’वर डिसेंबर महिन्यात ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही मालिका रात्री ८ ते ९ अशी एक तास प्रसारित केली जाते. या नव्या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वी ‘झी मराठी’वर महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे, अक्षरा-अधिपतीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेची वेळ बदलण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर १३ मार्च २०२३ रोजी प्रसारित झाली. सुरुवातीला ही मालिका रात्री ८ वाजता प्रक्षेपित केली जायची. ८ वाजताच्या स्लॉटला या मालिकेला टीआरपी सुद्धा चांगला मिळत होता. यानंतर अक्षरा-अधिपतीच्या मालिकेचा टीआरपी काहीसा कमी झाला. त्यामुळे ‘लक्ष्मी निवास’साठी या मालिकेची वेळ बदलून रात्री १०:३० अशी करण्यात आली होती. आता लवकरच वाहिनीवर ‘तुला जपणार आहे’ ही थ्रिलर मालिका सुरू होणार आहे.

‘तुला जपणार आहे’ ही मालिका १७ फेब्रुवारीपासून रात्री १०:३० ला प्रसारित केली जाईल असा प्रोमो समोर येताच आता अक्षरा-अधिपतीची मालिका संपणार का? अशा चर्चा सर्वत्र रंगू लागल्या होत्या. अखेर आता सर्व चर्चांवर पडदा पडला असून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ची मालिका पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे.

‘व्हॅलेंटाईन्स डे’ निमित्त ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अक्षरा-अधिपती भांडणं संपवून एकमेकांची भेट घेताना दिसतात. याशिवाय अक्षरा आपल्या नवऱ्याला गरोदर असल्याची गुडन्यूज सुद्धा देते. हा प्रोमो संपताच आता मालिका रात्री साडेदहा ऐवजी ११:०० वाजता प्रसारित केली जाईल अशी माहिती मिळते.

येत्या १७ फेब्रुवारीपासून नव्या मालिकेसाठी हा बदल करण्यात येणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आता प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार रात्री ११:०० वाजता पाहता येणार आहे.

दरम्यान, मालिकेच्या या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “हे स्वप्न नसूदेत आणि खरंच अक्षरा-अधिपतीची भेट होऊदेत” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत. आता अक्षराने अधिपतीसमोर गरोदर असल्याची गुडन्यूज दिल्यावर मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.