Harshada Khanvilkar & Ankita Walawalkar : गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. पण, आता छोट्या पडद्यावर सुद्धा लगीनघाई सुरू झालेली आहे. ‘झी मराठी’च्या ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या दोन मालिकांचा ‘महासंगम’ आजपासून सुरू होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना दोन भव्यदिव्य सोहळे पाहायला मिळणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पारू’ मालिकेत अहिल्यादेवी व कुटुंबीयांकडून अनुष्का व आदित्यचा साखरपुडा आयोजित करण्यात आला आहे. तर, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंत आणि जान्हवीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने नुकतीच ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या सेटवर उपस्थिती लावली होती. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच कुणालने सांभाळली आहे. त्यामुळे या सेटवर अंकिता-कुणालची सर्वांशीच ओळख आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकरांना अंकिता व कुणालने आपल्या लग्नाची पत्रिका दिली. यानंतर दोघांचं लग्न कसं जुळलं याबद्दलही त्यांना सांगितलं. हर्षदा खानविलकर कुणालला म्हणतात, “तुझाच सेट आहे हा… तुच म्युझिक करतोय आता सूनबाईंना लवकर घेऊन ये हा बाबा”

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/ankita_751fbd.mp4

पुढे, अंकिता म्हणते, “आमचं जमलं झी मराठीमुळेच… मी एक रेड कार्पेट इव्हेंट होस्ट करत होते. तेव्हाच आमची भेट झाली होती. कुणालला एका मालिकेसाठी अवॉर्ड मिळाला होता आणि त्याचवेळी मी होस्ट करत होते. आमची ओळख आधीच होती पण, आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो. तिथे आमची भेट झाली. त्यामुळेच आम्ही म्हणतो झी मराठीनेच जमवलंय” यानंतर हर्षदा खानविलकर, “आपण ऋणी आहोत झी मराठीचे” असं म्हणतात.

हर्षदा आणि अंकिता यांचा आणखी व्हिडीओ ‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अंकिता ‘लक्ष्मी’ला स्वत:च्या लग्नाची पत्रिका देत असल्याचं पाहायला मिळतंय. तर, लक्ष्मी अंकिताला जान्हवी आणि जयंतच्या लग्नाची पत्रिका देते. मालिकांचा हा महासंगम आजपासून सुरू होणार असून आता येत्या काळात यामध्ये कोणते ट्विस्ट अँड टर्न्स येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi ankita walawalkar reveals her lovestory in front of harshada khanvilkar sva 00