Zee Marathi New Serial Announcement : छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत ‘स्टार प्रवाह’ वाहिनी अव्वलस्थानी आहे. त्यामुळे आपले सुगीचे दिवस पुन्हा आणण्यासाठी ‘झी मराठी’कडून देखील प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये वाहिनीवर ‘शिवा’, ‘पारू’, ‘लाखात एक आमचा दादा’ अशा बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. अशातच आता टीआरपीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी ‘झी मराठी’कडून आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे.

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर झी मराठी ( Zee Marathi ) वाहिनीने या नव्या मालिकेचा पहिला टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमध्ये एक मुलगी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन मोठ्या भक्तीभावाने आराधना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. “पांडुरंगाची परमभक्त ती, सुरेल तिचा गळा, तुम्हालाही लागेल तिच्या गोड आवाजाचा लळा… ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवीन मालिका येतेय लवकरच आपल्या भेटीला” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा : “आमच्या लग्नाच्या CEO”, राधिका मर्चंटने केलं सासूबाई नीता अंबानींचं कौतुक! ईशा व श्लोकाबद्दल म्हणाली…

Zee Marathi ने केली नव्या मालिकेची घोषणा

मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना या मालिकेचं नाव सांगून प्रदर्शनाची तारीख व मुख्य कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. आता ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका नेमकी केव्हापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ या नव्या मालिकेची पहिली झलक शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अप्रतिम…”, “जय जय राम कृष्ण हरी”, “मस्त आहे प्रोमो…”, “ही मालिका लवकर आणा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : “ही मी पोस्ट केलेली सर्वात खासगी गोष्ट…”, रिचा चड्ढाने ‘त्या’ फोटोंसह लिहिला संस्कृत श्लोक, कमेंट्स सेक्शन केले बंद

zee marathi
झी मराठीची नवीन मालिका ( फोटो सौजन्य : Zee Marathi इन्स्टाग्राम )

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सुरू झाली आहे. यामध्ये नितीश चव्हाण व दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नितीश या मालिकेत सूर्यादादाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समृद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी सूर्या दादाच्या बहिणीच्या रुपात झळकत आहेत.