Zee Marathi Announces New Reality Show : ‘झी मराठी’वर नुकतीच सुरू झालेली ‘लक्ष्मी निवास’ ही कौटुंबिक मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही मालिका तब्बल १ तास प्रसारित केली जाते, अल्पावधीतच ‘लक्ष्मी निवास’ला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे. याशिवाय येत्या १७ फेब्रुवारीपासून ‘तुला जपणार आहे’ ही नवीन थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुद्धा दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळेल. या नव्या मालिकांबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असताना आता झी मराठी’ वाहिनीने एक मोठी घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’वर सध्या एकही रिअ‍ॅलिटी शो सुरू नाहीये. यापूर्वी वाहिनीवर ‘चला हवा येऊ द्या’, ‘सारेगमप’, ‘होम मिनिस्टर’, ‘जाऊ बाई गावात’ असे बरेच शो सुरू होते. मात्र, त्यानंतर टीआरपीच्या दृष्टीकोनातून निर्णय घेत ‘झी मराठी’वर अनेक बदल करण्यात आले. अनेक वर्षानुवर्षे सुरू असलेले बहुतांश शो रिप्लेस करण्यात आले. आता मालिकांना चांगला प्रतिसाद मिळू लागल्यावर वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता लवकरच एक आगळावेगळा रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो नेमका काय आहे पाहुयात…

“गावातला रांगडा गडी आणि शहरातली नाजूक नार जेव्हा एकत्र येणार तेव्हा काय राडा होणार?” झी मराठीवर वाहिनीवर लवकरच सुरू होणारे ‘चल भावा सिटीत’. या नव्या शोचं नाव खूपच हटके आहे. तसेच याची संकल्पना सुद्धा एकदम हटके असणार आहे. वाहिनीने दिलेल्या कॅप्शनवरून गावातली मुलं आणि शहरात राहणाऱ्या मुली यांना घेऊन ‘झी मराठी’ हा नवीन शो सुरू करणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये व्यक्त केला आहे.

‘चल भावा सिटीत’ या शोच्या पहिल्याच प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता या शोचा होस्ट कोण असणार? यामध्ये एकूण किती स्पर्धक सहभागी होणार या गोष्टींचा उलगडा लवकरच करण्यात येईल. अद्याप वाहिनीने या शोच्या प्रदर्शनाची तारीख किंवा प्रसारणाची वेळ यापैकी काहीच जाहीर केलेलं नाही. लवकरच याबद्दल अधिकृत माहिती प्रेक्षकांना देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi announces new reality show chal bhava cityt first promo out now sva 00