Zee Marathi : छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ठरवण्यासाठी सध्याच्या काळात टीआरपीला प्रचंड महत्त्व दिलं जातं. एखाद्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसेल तर, संबंधित मालिका अवघ्या वर्षभराच्या आतच गुंडाळल्या जातात. याची अनेक उदाहरणं गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहेत. तर, काही मालिका कथानक अंतिम टप्प्यात पोहोचल्यावर प्रेक्षकांचा निरोप घेतात. एकंदर टीआरपीसाठी जुन्या मालिका बंद करून नवीन मालिका किंवा शो सुरू करणं, नवनवीन ट्विस्ट आणणं असे अनेक प्रयत्न वाहिन्यांकडून केले जात आहेत.
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. वाहिनीवर १५ मार्चपासून श्रेयस तळपदेचा ‘चल भावा सिटीत’ हा नवीन शो चालू होणार आहे. हा शो रात्री ९:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. यामुळे ‘झी मराठी’ने ‘लाखात एक आमचा दादा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या तीन मालिकांच्या वेळा बदलल्या आहेत. तर, वाहिनीवरच्या दोन मालिका बंद होणार आहेत.
‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्यावर्षी १८ मार्चला एक नवीन मालिका सुरू करण्यात आली होती. या मालिकेचं नाव होतं ‘पुन्हा कर्तव्य आहे’. या मालिकेचा विषय सुद्धा काहीसा वेगळा होता. अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे यांची फ्रेश जोडी या मालिकेत पाहायला मिळाली होती. ही मालिका प्रेक्षकांचा वर्षभरातच निरोप घेणार आहे. अक्षया हिंदळकरने शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत याबद्दल यापूर्वीच माहिती दिली होती.
‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेसह गेली अडीच वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारी ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रोहित परशुरामने भावुक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. तसेच या मालिकेला इथून पुढे मिस करू असंही म्हटलं होतं.

‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ या दोन्ही मालिका अनुक्रमे सायंकाळी सहा आणि साडेसहा वाजता प्रसारित केल्या जायच्या. या मालिकांऐवजी आता या वेळेत अक्षरा अधिपतीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘लाखात एक आमदा दादा’ या दोन मालिका प्रक्षेपित केल्या जातील. वाहिनीवर १७ मार्चपासून हा बदल करण्यात येणार आहे.