छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे सुरू असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान तयार करतात. या मालिकांमधील पात्रं प्रत्येकाला हवीहवीशी वाटतात. एकदा मालिका लोकप्रिय ठरली की, त्यामधील प्रत्येक कलाकाराला घराघरांत पसंती मिळते. ‘वादळवाट’, ‘आभाळमाया’, ‘कळत नकळत’, ‘असंभव’, ‘तू तिथे मी’ या मालिका संपून आता अनेक वर्षे उलटली आहेत. तरीही या सदबहार मालिकांची शीर्षक गीतं, यामधील मुख्य पात्र, कलाकार सगळं काही प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.

‘झी मराठी’वर साधारण पावणे तीन वर्षे सुरू असलेल्या एका लोकप्रिय मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत सगळेच नवोदित कलाकार होते. मात्र, या मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांना पहिल्या दिवसापासून भावलं. नुकतीच या मालिकेने छोट्या पडद्यावरून एक्झिट घेतली आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका २२ ऑगस्ट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अनेकदा या मालिकेच्या वेळा बदलण्यात आल्या. मात्र, तरीही ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला प्रेक्षकांचं सुरुवातीपासूनच भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेच्या टीआरपीत चिमुकल्या ‘सिंबा’च्या म्हणजेच साईराज केंद्रेच्या एन्ट्रीनंतर चांगली वाढ झाली.

शिवानी नाईक ( अप्पी – अपर्णा माने ) आणि रोहित परशुराम ( अर्जुन कदम ) हे कलाकार मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत होते. या मालिकेने नुकताच सर्वांचा निरोप घेतला. यानंतर, अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

“पावणेतीन वर्षे… ८५० एपिसोड… २००० पेक्षा जास्त सीन्स… असंख्य इमोशन्स…. अगणित चांगल्या वाईट आठवणी…. एक आसगाव आणि एक अर्जुन वर्षा विनायक कदम… प्रवास थांबला. एकदा संपलं की संपलं… ते परत नाही येत. ए आरज्या ( अर्जुन – मालिकेतील नाव ) तुला न्याय देण्याचा जीव ओतून प्रयत्न केला रे मी… भेटू परत कधीतरी आसगावात” असं लिहित रोहितने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अभिनेत्याच्या पोस्टवर समृद्धी केळकर, शरयू सोनावणे या अभिनेत्रींनी कमेंट्स करत रोहितला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर, नेटकऱ्यांसह त्याच्या चाहत्यांनी, “इथून पुढे ही मालिका आणि अर्जुन या तुझ्या पात्राला मिस करू” अशा प्रतिक्रिया कमेंट्समध्ये दिल्या आहेत.