Zee Marathi Awards 2024 : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याचा पहिला भाग २५ ऑक्टोबरला पार पडला. या सोहळ्याला गेली २५ वर्षे मालिकाविश्वात सक्रिय असलेले सगळे दिग्गज कलाकार उपस्थित होते. यंदा सर्वोत्कृष्ट जावई या पुरस्कारावर एजेने ( अभिराम जहागीरदार ) नाव कोरलं. ही भूमिका राकेश बापट साकारत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एवढी वर्षे हिंदी कलाविश्व गाजवून आलेल्या राकेश बापटने यंदा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिविश्वात एन्ट्री घेतली. त्यामुळे हा पुरस्कार खास ठरवण्यासाठी वाहिनीने ( Zee Marathi Awards ) मंचावर खास त्याच्या आईला आमंत्रित केलं होतं.

राकेशने पुरस्कार स्वीकारल्यावर मंचावर आई येत असल्याचं पाहिलं अन् तो भावुक झाला. तो प्रेक्षकांना म्हणाला, “आपण आईला कुठेही बघतो तेव्हा मन भरून येतं.”

हेही वाचा : आर्या जाधवचा फोन आल्यावर सूरज चव्हाण म्हणाला, “कोण पाहिजे?” रॅपरने माफी मागितली अन्…, पाहा Video

Zee Marathi Awards : एजे ठरला सर्वोत्कृष्ट जावई

यानंतर राकेशच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “राकेशच्या करिअरची नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आणि आता ‘झी मराठी’ वाहिनीची सुद्धा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काही वर्षांमध्ये त्याने अनेक हिंदीमध्ये मालिका, चित्रपट, शो केले. कालांतराने तो मराठी चित्रपटांमध्ये काम करू लागला. तेव्हा मी त्याला म्हणाले, ‘आता तू मराठी मालिका कर’ आज माझी पंचाहत्तरी सुरू आहे. मला तो म्हणाला, ‘तुला ७५ व्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून मी मराठी मालिकेत काम करणार…’ आणि आज तो खूप छान काम करतोय. त्याने मला खूप मोठं गिफ्ट दिलं…यासाठी मी नेहमी त्याची आभारी आहे.”

Zee Marathi Awards

पुढे संकर्षण राकेशच्या आईला विचारतो, “तुमच्या हातात एक वही आहे काकू ती कशासाठी?” यावर राकेश बापटची आई म्हणाली, “मी त्याची खूप मोठी फॅन आहे. ऑटोग्राफ घ्यायला ही वही आणलीये.” राकेश आईचे शब्द ऐकून भावुक होत म्हणतो, “आता आईला कसा ऑटोग्राफ देणार…तिला मी गोड मिठी मारतो.” यानंतर या मायलेकांना अश्रू अनावर झाल्याचं पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळालं.

हेही वाचा : Bigg Boss 18 मध्ये मोठा ट्विस्ट! डबल एव्हिक्शनमध्ये ‘हे’ दोन सदस्य घराबाहेर, सलमान खान घेणार अविनाश मिश्राची शाळा

“एजे जसा आपल्या कुटुंबावर प्रेम करतो तसा राकेश पण आमच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. एजेला जशा सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात, स्वच्छता आवडते अगदी त्याचप्रमाणे राकेशला सुद्धा या सगळ्या गोष्टी आवडतात. पण, यात एकच परफेक्शन नाहीये ते म्हणजे तो कधीही वेळ पाळत नाही.” असं त्याच्या आईने यावेळी सांगितलं. ही गोष्ट समोर बसलेल्या शर्मिष्ठा राऊतने देखील मान्य केली. अभिनेत्री ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेची निर्माती आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi awards aj aka rakesh bapat got emotional after seen his mother in show softnews sva 00