झी मराठी वाहिनीवर नव्यानेच भेटीला आलेल्या ‘चल भावा सिटीत'(Chal Bhava Citit) रिअॅलिटी शोची चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या शोमध्ये शहरातील काही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर व काही अभिनेत्री अशा १३ मुली स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. तर गावात राहणारी शेती व इतर व्यवसाय करणारी १२ मुले यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. मुलींनी ‘सिटी सुंदरी’ असे म्हटले जात आहे तर मुलांना ‘गावरान ब्रो’ असे म्हटले जात आहे. सिटीत गाव गाजणार, म्हणजे नेमकं काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता या शोचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘चल भावा सिटीत’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
झी मराठी वाहिनीने चल भावा सिटीत या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सिटी सुंदरी व गावरान ब्रो यांच्या जोड्या केल्या आहेत. यामध्ये काजल मात्र एकटी आहे,तिला कोणीही जोडीदार नाही. पण, तिला या १२ मुलांचे मन वळवून तिच्याबरोबर जोडीदार होण्यास एकाला तयार करायचे आहे. श्रेयस तळपदे काजलला म्हणतो, “काजल तुझ्यासमोर १२ दरवाजे आहेत. तू लक्ष ठेवायचं आहे की तू काय करू शकतेस” त्यानंतर काजल मुलांकडे जात त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करते. “माझ्याकडे पॉवर आहे, मी कोणालाही निवडू शकते”, “जर तू मला निवडलेस तर मी तुला टॉपमध्ये ठेवेन”, “माझं खूप चांगलं बॉण्डिंग तुझ्याशीच झालं आहे, बाकी कोणाशी झालं नाही”, “मी तुला बोलायला शिकवणार, तुला शो जिंकवणार, मार्गदर्शन करणार”, अशा वेगवेगळ्या गोष्टी ती वेगवेगळ्या मुलांना सांगत असल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे. तर इतर मुली त्यांचा जोडीदार असलेल्या मुलाला तिच्याशी बोलण्यापासून थांबवत असल्याचे दिसत आहे. श्रेयस तळपदे तिला ती योग्य पद्धतीने प्रयत्न करत असल्याचे सांगतो.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर, “पार्टनर मिळवण्यासाठी काजल खेळणार कोणता डाव?” अशी कॅप्शन दिली आहे.
आता प्रोमो पाहिल्यानंतर काजल तिच्या प्रयत्नांत यशस्वी होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कोण कोणावर भारी पडणार आणि कोणते स्पर्धक कसा खेळ खेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कोणत्या स्पर्धकाचा खेळ प्रेक्षकांचे मन जिंकणार, तसेच या स्पर्धकांना कोणते नवनवीन टास्क मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.