‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिअॅलिटी शोची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक जोशी म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका राणादा ‘झी मराठी’वर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या शोचा प्रोमो ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला होता. हा नवा रिअॅलिटी सुरूवातीला ८.३० वाजता प्रसारित होणार होता परंतु, आता अधिकृतरित्या या कार्यक्रमाची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
‘जाऊ बाई गावात’ हा नवीन गेमिंग रिअॅलिटी शो शहरात ऐशोआरामात वाढलेल्या मुली ग्रामीण आयुष्य जगू शकतील का? या संकल्पनेवर आधारित आहे. हा कार्यक्रम सुरूवातीला २७ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार होता. या कार्यक्रमामुळे ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची वेळ बदलण्यात आली होती. परंतु, प्रदर्शित होण्यापूर्वीच या नव्या रिअॅलिटी शोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिअॅलिटी शो आता २७ नोव्हेंबरऐवजी ४ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० च्या वेळेत प्रसारित केला जाणार आहे. यामध्ये हार्दिक जोशीने सूत्रसंचलनाची धुरा सांभाळणार आहे.
हेही वाचा : इन्स्टाग्रामवर फेक फॉलोवर्स विकणाऱ्या नेटकऱ्याला सिद्धार्थ चांदेकरचं रोखठोक उत्तर; म्हणाला, “तुलाच का…”
दरम्यान, ‘झी मराठी’च्या ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांमध्ये हार्दिक जोशीने मुख्य भूमिका साकारली होती. आता तो ‘जाऊ बाई गावात’ या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा नवीन शो गावच्या पारंपरिक संस्कृतीवर आधारित असेल. या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून राणादाच्या कमबॅकमुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.