चित्रपट, नाटक, वेब सीरिज पाहणाऱ्या प्रेक्षकवर्गात गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. या तीन माध्यमांना पसंती मिळत असली तरीही छोट्या पडद्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेत आजही घराघरांत मालिका पाहिला जातात. सध्या स्टार प्रवाह, झी मराठी आणि कलर्स मराठी या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी चढाओढ सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी आता झी मराठी वाहिनीने दोन लोकप्रिय मालिकांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : ‘बाजीगर’ फेम अभिनेते दलिप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?
झी मराठी वाहिनीवर २१ ऑगस्ट २०२३ पासून ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका सुरू झाली. या मालिकेसाठी ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेची ७ ची वेळ बदलून रात्री ११ वाजता अशी करण्यात आली. यानंतर आता वाहिनीने आणखी एका मालिकेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘तू चालं पुढं’ ही गेल्या वर्षभरापासून ७.३० ला प्रसारित होणारी मालिका इथून पुढे ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तसेच ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका प्रेक्षकांना ७.३० वाजता पाहता येणार आहे. एकंदर या दोन्ही मालिकांची वेळ आपआपसात बदण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरपासून बदललेल्या नव्या वेळेत या मालिका प्रसारित केल्या जाणार आहे. ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत उमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री खुशबू तावडेने यासंदर्भात पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
दरम्यान, दररोज या मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांनी यावर आपलं मत मांडलं आहे. “फक्त टीआरपीसाठी असा बदल करणं योग्य नाही”, “दोन मालिकांच्या वेळेत आपआपसात बदल करून काय होणार?” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी कमेंट्स सेक्शनमध्ये दिल्या आहेत.