Zee Marathi : ‘झी मराठी’ वाहिनीवर श्रेयस तळपदे पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम येत्या १५ मार्चपासून सुरू होणार आहे. यामध्ये शहरातल्या ‘सुंदरी’ आणि गावरान ‘ब्रो’ यांचा अनोखा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. १५ मार्चपासून हा कार्यक्रम रोज रात्री ९:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. आता श्रेयसचा शो सुरू होणार असल्याने सध्या सुरू असणाऱ्या मालिकांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत.
‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या १७ मार्चपासून महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहे. छोट्या पडद्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मालिका, रिअॅलिटी शो यांची लोकप्रियता टीआरपीच्या आधारावर ठरवली जाते. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या वाहिन्या अनेक प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवर नवा ‘चल भावा सिटीत’ हा रिअॅलिटी शो सुरू होणार असल्याने तीन मालिकांच्या वेळा बदण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘लाखात एक आमचा दादा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांचा समावेश आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या रात्री ११ वाजता प्रसारित केली जाते. आता या मालिकेची वेळ बदलून ती सायंकाळी ६ वाजताची करण्यात आली आहे. तर, अकराच्या स्लॉटला आता प्रेक्षकांना एजे-लीलाची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आता रात्री दहाऐवजी अकरा वाजता प्रसारित केली जाईल. तर, सूर्या दादाची मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाणार आहे.
१७ मार्चपासून ‘या’ तीन मालिकांच्या वेळेत केला बदल
- तुला शिकवीन चांगलाच धडा – नवीन वेळ सायंकाळी ६ वाजता
- लाखात एक आमचा दादा – नवीन वेळ ६:३० वाजता
- नवरी मिळे हिटलरला – नवीन वेळ ११ वाजता
दरम्यान, आता ‘झी मराठी’च्या नव्याने सुरू होणाऱ्या श्रेयस तळपदेच्या शोला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या शोमध्ये जोआना अश्का, भाग्यश्री मुरकर, अक्षता उकिरडे, गायत्री दातार, अनुश्री माने या अभिनेत्री सहभागी होणार आहे. हा शो येत्या १५ मार्चपासून दररोज रात्री ९:३० वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे.