Zee Chitra Gaurav 2025 : विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नम्रता संभेरावला ओळखलं जातं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे अभिनेत्रीला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली, तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये नम्रताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतीच तिने ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला पार पडतो. या सोहळ्यात गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या, प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या चित्रपटांचा व कलाकारांचा सन्मान केला जातो. यंदा या सोहळ्यात नम्रताला देखील नामांकन मिळालं होतं.
नम्रता संभेरावला ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘नाच गं घुमा’ सिनेमात साकारलेल्या पात्रासाठी आणि ‘झी नाट्यगौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकासाठी ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’ या सेगमेंटमध्ये नामांकन मिळालं होतं. ‘चित्र’ आणि ‘नाट्य’ हे दोन्ही पुरस्कार सोहळे स्वतंत्ररित्या पार पडतात. यापैकी ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा १८ फेब्रुवारीला सायंकाळी पार पडला. याचं प्रक्षेपण टिव्हीवर काही दिवसांनी करण्यात येतं, तेव्हाच विजेते प्रेक्षकांसमोर येतात. मात्र, वनिता खरात व प्रसाद खांडेकरने लाडकी मैत्रीण विजयी झाल्यावर तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये नम्रताला कोणता पुरस्कार मिळालाय हे स्पष्टपणे दिसत आहे.
नम्रताच्या हातात पुरस्कार असलेला फोटो प्रसाद खांडेकरने त्याच्या स्टोरीवर शेअर केला आहे. “नम्रता अभिनंदन…तुझा खूप अभिमान वाटतोय” असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोला दिलं आहे. नम्रताच्या हातातील पुरस्कारावर ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’ ( चित्रपट विभाग ) असं लिहिल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून नम्रतावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. आता हा सोहळा प्रेक्षकांना लवकरच टिव्हीवर पाहता येणार आहे. यामध्ये आणखी विजेत्यांची यादी सविस्तरपणे प्रेक्षकांसमोर येईल.