Zee Chitra Gaurav 2025 : मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. या सोहळ्याचं प्रक्षेपण येत्या ८ मार्चला ‘झी मराठी’ वाहिनीवर करण्यात येणार आहे. याच दरम्यान प्रेक्षकांना हा भव्यदिव्य सोहळा पाहता येईल. यंदा या सोहळ्याला कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, श्रेयस तळपदे, महेश कोठारे, निवेदिता सराफ, मृणाल कुलकर्णी अशी बरीच मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. सध्या या सोहळ्याची काही क्षणचित्रे व इनसाइड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात स्टार अभिनेता श्रेयस तळपदे ‘झी मराठी’च्या सगळ्या नायिकांबरोबर थिरकणार आहे. शिवा, भावना, लीला, पारू या सगळ्या अभिनेत्रींनी श्रेयसबरोबर डान्स केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या सगळ्या नायिकांमध्ये ‘झी मराठी’च्या एकमेव खलनायिकेला श्रेयसबरोबर डान्स करण्याची संधी मिळाली आहे.
श्रेयसबरोबर परफॉर्म करणारी खलनायिका दुसरी तिसरी कोणीही नसून ‘पारू’ मालिकेतील दिशा आहे. ‘पारू’ मालिकेत दिशा या खलनायिकेची भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदे साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिशा या पात्राची मालिकेत रिएन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं. आता श्रेयसबरोबर परफॉर्मन्स सादर करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल अभिनेत्री काय म्हणालीये जाणून घेऊयात…
“नमस्कार, मी पूर्वा शिंदे. आज मी ‘झी चित्र गौरव २०२५’ या पुरस्कार सोहळ्यात श्रेयस तळपदे सरांबरोबर मी एक खास परफॉर्मन्स सादर केला आहे. ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’ या एव्हरग्रीन गाण्यावर आम्ही सादरीकरण केलं. इतक्या मोठ्या सोहळ्यात जेव्हा आपल्याला परफॉर्मन्स करायला मिळतो तेव्हा खरंच खूप जास्त भारी वाटतं. हे झी ‘मराठी वाहिनी’चं २५ वं वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी हा सोहळा खूप मोठा आणि जबरदस्त झालेला आहे. परफॉर्मन्स सादर करताना खूप मजा आली. त्यांच्याबरोबर परफॉर्म करण्यासाठी सगळ्या नायिका होत्या आणि मी एकटीच खलनायिका होते.” असं सांगत पूर्वाने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’ या ‘पिंजरा’ सिनेमातील गाण्यावर दिशा आणि श्रेयस एकत्र थिरकल्याचं वाहिनीने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हे एव्हरग्रीन गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं आहे. नेटकऱ्यांनी दिशा आणि श्रेयसचा डान्स पाहून व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा येत्या ८ मार्चला सायंकाळी ७ वाजता प्रसारित केला जाणार आहे.