Zee Marathi Serial Lakhat Ek Aamacha Dada : ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणारी ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत तुळजाची भूमिका साकारणाऱ्या मुख्य अभिनेत्रीने प्रकृतीच्या कारणास्तव या मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. आता ‘तुळजा’च्या रुपात मालिकेत मृण्मयी गोंधळेकरची एन्ट्री झालेली आहे. यापूर्वी तिने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत राजमाची भूमिका साकारली होती. आता नव्या तुळजाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या मालिकेत सूर्या आणि तुळजामध्ये वाद निर्माण झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मालिकेत जालिंदरच्या घरातील पार्टीत गोंधळ झाल्यानंतर, सूर्या त्याच्या बहिणींना घरी घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी, त्याच्या चारही बहिणी त्याला त्याची चूक लक्षात आणून देतात. आता सूर्या दादा तुळजाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच, जगताप कुटुंबीयांच्या घरी धनूला एक स्थळ पाहायला येतं. यावेळी सूर्या मोठ्या काळजीत पडतो कारण, तुळजाशिवाय पाहुणे लग्नाचा प्रस्ताव नाकारू शकतात…याची त्याला पूर्ण खात्री असते. तुळजाला किमान धनूच्या लग्नाची बोलणी होईपर्यंत तरी थांबण्याची विनंती सूर्या करतो. पाहुणे तुळजाच्या अनुपस्थितीबद्दल विचारपूस करतात. जालिंदर सूर्या आणि तुळजामधील संघर्ष उघड करणार तेवढ्यातच तुळजा दारात येते. यावेळी मालिकेत मृण्मयीची एन्ट्री होणार आहे.

सूर्याची आई येणार…

तर, आता येत्या काळात तुळजाला वैद्यकीय शिबिरासाठी जेलमध्ये बोलावलं जातं. योगायोगाने, हे तेच जेल आहे जिथे सूर्याची खरी आई आहे आणि जालिंदरला कळतं की ती पॅरोलवर सुटणार आहे. जालिंदरला हे ही समजलंय सूर्या आणि तुळजा याच जेलमध्ये शिबिरासाठी जाणार आहेत. आता जालिंदर सूर्या आणि त्याच्या आईची भेट टाळू शकेल? सूर्या आणि त्याच्या आईची तुरुंगात भेट होईल का? याची उत्तर प्रेक्षकांना ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.

सूर्याच्या आईची भूमिका कोण साकारणार?

नव्या तुळजा पाठोपाठ मालिकेत सूर्याची आई म्हणून आणखी एका अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे राजश्री निकम. या मालिकेत ती सूर्या दादाच्या आईची भूमिका साकारणार आहे. याबद्दल अभिनेत्रीने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. राजश्री निकम लिहिते, “माझी तुमच्या आवडत्या मालिकेत म्हणजेच ‘लाखात एक आमचा दादा’ मध्ये आई म्हणून एन्ट्री होतेय त्यामुळे ही मालिका रोज रात्री ९.३० वाजता पाहायला विसरू नका.”

दरम्यान, आता सूर्याची आई मालिकेत आल्यावर कथानकात काय ट्विस्ट येणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर आहेत.

Story img Loader