‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेतील सूर्याच्या घरावर सतत काही ना काही संकट येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शत्रूच्या खऱ्या रूपाविषयी सूर्याला समजले. तो तेजूवर हात उचलत असताना सूर्याने पाहिले. त्यानंतर सूर्याने शत्रूला कडक शब्दात सुनावत तेजूला घरी आणले. जोपर्यंत शत्रू त्याचे वागणे सुधारत नाही, तोपर्यंत तेजू माहेरीच राहील, सासरी जाणार नाही, असे सूर्याने स्पष्ट केले. संपूर्ण गावासमोप सूर्याने शत्रूला मारले होते. त्यामुळे हा अपमान समजत डॅडींनी याचा बदला घेण्याचे ठरवले होते. याच्या काही दिवसानंतर सूर्याच्या दुसऱ्या बहिणीचे लग्न ठरले होते. धनुच्या लग्नाची तयारीही झाली होती. मात्र, हे लग्न मोडले. आता सूर्या बहिणींच्या सुखासाठी देवीचे कडक व्रत करणार आहे. मात्र, शत्रू यामध्ये विघ्न आणणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
सूर्याला त्रास देण्यासाठी शत्रूचा नवा डाव
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लाखात एक आमचा दादा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सूर्या देवीच्या व्रताला सुरूवात करत आहे. काजू देवीच्या फोटोसमोर हात जोडत म्हणतो, “देवी आई दादाच्या हातून हे कार्य नीट पार पडू दे.” सूर्या त्याचे व्रत सुरू करण्यास तयार होतो. तिथे काही बैलगाड्या दिसत आहेत. त्या एकमेकांना एकापाठोपाठ अशा जोडलेल्या आहेत. शत्रूदेखील तिथे उपस्थित असल्याचे दिसत आहे. तो तेथील एका माणसाला म्हणतो, “सगळी चाकं तर नीट दिसत आहेत. आता त्याच्यासमोर जाऊन सैल करशील का?” त्यावर तो माणूस त्याला म्हणतो, “तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला पाहिजे तसंच होणार.” त्या व्यक्तीने शत्रूला आश्वस्त केल्यानंतर शत्रू त्याला पैसे देतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की सूर्याने त्याच्या खांद्यावर बैलगाडीचा जू घेतला आहे. तो मोठ्या कष्टाने बैलगाड्यांचे ओझे ओढत असल्याचे दिसत आहे. याचदरम्यान बैलगाडीचे एक चाक निसटताना दिसत आहे. सूर्याला प्रोत्साहन देण्यासाठी तुळजा तसेच त्याच्या बहिणीदेखील उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सूर्याच्या महाकठीण व्रतात शत्रू आणू शकेल का विघ्न?”, अशी कॅप्शन दिली आहे.
लाखात एक आमचा दादा मालिकेत सूर्या त्याच्या बहिणींच्या सुखासाठी काहीही करायला असतो. आता तो देवीचे महाकठीण व्रत करत आहे. हे व्रत आधी कोणीही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे आता सूर्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत हे व्रत पूर्ण करणार का पाहणे, महत्वाचे ठरणार आहे. शत्रू नेहमीच त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. आता पुढे काय करणार, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.