Lakhat Ek Aamcha Dada upcoming Twist: ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी सूर्याच्या आईची काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सूर्या अजूनही त्याच्या आईला भेटू शकलेला नाही.
सूर्याची आई तो आणि त्याच्या बहिणी लहान असतानाच घरातून निघून गेली. त्यानंतर ती पळून गेली आहे, अशी गावात चर्चा झाली. त्यामुळे सूर्याच्या वडिलांना दारूचे व्यसन लागले. परिणामी, घरासह बहिणींची जबाबदारी सूर्यावर आली. त्याने बहिणींना मोठ्या प्रेमाने वाढवले. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. त्या सुखात राहाव्यात यासाठी त्याने सातत्याने प्रयत्न केले. त्याने वडिलांचादेखील प्रेमाने सांभाळ केला. मात्र, सूर्याच्या मनात ही गोष्ट कायम राहिली की, आईने तिच्या मुलांचा विचार केला नाही.
या सगळ्यात सूर्याला ही गोष्ट माहीतच नाही की, त्याची आई वर्षानुवर्षे तुरुंगात होती. तो ज्या डॅडींना म्हणजेच जालिंदरला देव मानतो, त्यांच्यामुळेच सूर्याची आई तुरुंगात होती. मात्र, त्याला या सत्यापासून डॅडींनी कायम दूर ठेवले. सूर्याविरुद्ध डॅडींनी अनेक कट-कारस्थाने केली; मात्र त्याला थोडीफार मदत करीत त्याच्यावर त्यांचे उपकार आहेत, याची त्यांनी त्याला नकळत जाणीव करून दिली.
सूर्याला वाटते की, डॅडींनी त्याला वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे तो त्यांना देव मानतो. त्यांच्याविरुद्ध तो कोणाचेही काहीच ऐकून घेत नाही. सूर्याची पत्नी आणि डॅडींची मुलगी तुळजाने अनेकदा डॅडींचे सत्य सूर्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे सूर्या व तिच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
‘लाखात एक आमचा दादा’मध्ये ट्विस्ट
सूर्याची आई आशा तुरुंगातून बाहेर आल्याचे डॅडींना समजले आहे. ते तिच्या शोधात आहेत. तुरुंगातील एका महिलेने डॅडींना फोन करून आशा कुठे आहे, याचा पत्ता सांगितल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाले. आता सूर्याची आई डॅडींना सापडणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लाखात एक आमचा दादा या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, गावातील लोक कशाची तरी शोधाशोध करीत आहेत.
माणसांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी एका घराजवळ लोक येतात, तेव्हा डॅडी त्यांना सांगतात की, येथे शोधण्याची काहीच गरज नाही. आमच्या नजरेखालची जागा आहे ही. छत्री म्हणतो, आता डॅडींनी शब्द दिलाय ना, तर विषय संपला, इकडे येण्याची कोणाची टाप आहे का?
याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, डॅडींनी निर्जन भागातील त्या घरात सूर्याच्या आईला म्हणजेच आशाला बांधून ठेवले आहे. ती पाणी, असे म्हणत आहे आणि डॅडी पाण्याचा ग्लास तिच्यापुढे रिकामा करत घे, असे म्हणताना दिसत आहेत. त्यानंतर ते छत्रीला सांगतात की, तिला आजच रात्री इथून दुसरीकडे पाठवा. त्यानंतर छत्री आशाला म्हणतो की, आता तुला अशी अद्दल घडवतो ना, तू बेंबीच्या देठापासून ओरडशील. त्यानंतर जेवणाच्या ताटातील मीठ घेऊन इतर गुंडाच्या साह्याने तिच्या पायावरील जखमेवर मीठ चोळताना दिसत आहे. आशा वेदनेने विव्हळत आहे. तेथील निर्जन रस्त्यावरून तुळजा जात असते. तिला मोठमोठ्याने विचित्र हसण्याचा आवाज येतो. ती त्या घराच्या खिडकीतून आत पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘जालिंदरच्या जाचातून कोण सोडवणार सूर्याच्या आईला?’, अशी कॅप्शन दिली आहे.दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, सूर्यासमोर डॅडींचे सत्य येणार का, तुळजा सूर्याच्या आईला वाचवू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.