‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका सूर्यादादा व त्याच्या बहिणींमधील प्रेमळ नात्यामुळे प्रेक्षकांची लाडकी झाली. सूर्या व तुळजाच्या जोडीनेदेखील प्रेक्षकांची मने जिंकली. तात्या, भाग्या, राजश्री, धनश्री, तेजश्री, तसेच डॅडी, शत्रू व त्यांचे संपूर्ण कुटुंब, काजू व पुड्या, सूर्याचे मामा, त्यांची मुलगी मालिकेतील अशा सर्वच पात्रांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, धनू देवीसमोर हात जोडून उभी आहे. ती देवीसमोर प्रार्थना करीत म्हणते, “देवीआई एक वेळ माझं लग्न झालं नाही तरी चालेल; पण दादाला थांबव.” पुढे सूर्या देवीचे कठोर व्रत करणार असल्याचे समोर येते. सूर्याच्या बहिणी तुळजाजवळ त्यांच्या मनातील भीती व्यक्त करतात. राजश्री म्हणते, “वहिनी, आजपर्यंत कोणीच हे व्रत पूर्ण करू शकले नाही.” तेजू म्हणते, “म्हणूनच आम्हाला दादाबरोबरच तुझीसुद्धा काळजी वाटते.” भाग्या म्हणते, “कारण-सगळा त्रास तुलाच होणार आहे.” तुळजा त्यांना समजावत म्हणते, “तुम्ही काळजी करू नका. सूर्या हे व्रत व्यवस्थित पार पाडेल.”
याच प्रोमोमध्ये तुळजाचे वडील डॅडी, “आणि कुठं काय कमी पडलंच. तर पार पाडायला हा जालिंदर आहेच की”, असे म्हणत डॅडी विचित्र हसताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीने हा व्हिडीओ शेअर करताना, ‘देवी आईचं खडतर व्रत निर्विघ्नपणे पार पाडू शकेल सूर्या?’, अशी कॅप्शन दिली आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूर्याचा लूकही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याच्या गळ्यात माळा दिसत आहे. चेहऱ्यावर उग्र भाव दिसत आहेत.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सूर्याने त्याची आई त्यांच्या आयुष्यातून गेल्यापासून त्याच्या बहिणींचा प्रेमाने सांभाळ केलेला असतो. तो त्याच्या वडिलांना म्हणजेच तात्यांनादेखील त्याने सांभाळलेले असते. संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्यावर असते. चार बहिणींना लहानाचे मोठे करणे, त्यांना शिक्षण देणे, त्यांची लग्ने लावून देणे ही तो त्याची कर्तव्ये समजतो. नुकतेच धनश्रीचे लग्न मोडले आहे. त्यामुळे सूर्याच्या घरात नाराजीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.
आता धनश्रीचे लग्न व्हावे म्हणून सूर्या काय करणार, डॅडी सूर्याला त्रास देण्यासाठी काय करणार, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही मालिका आता ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.