गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिकाविश्वात अनेक नवनवीन बदल घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एक्झिट घेतली. या बातमीनंतर मालिकेच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता. याशिवाय तेजश्रीच्या एक्झिटनंतर या मालिकेच्या टीआरपीवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. आता आणखी एका मुख्य अभिनेत्रीने लोकप्रिय मालिकेतून एक्झिट घेतल्याची बातमी समोर आली आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका गेल्यावर्षी ८ जुलैला सुरू झाली. या मालिकेत ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण ‘सूर्या दादा’ची प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेची घोषणा झाल्यावर सूर्या दादाची ‘तुळजा’ कोण असणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अभिनेत्री दिशा परदेशी या तुळजाच्या भूमिकेत झळकणार असल्याचा अधिकृत प्रोमो समोर आला होता. मालिका सुरू झाल्यापासून दिशा आणि नितीश यांच्या जोडीला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, आता दिशा लवकरच ‘लाखात एक आमचा दादा’मधून एक्झिट घेणार आहे.
गेली जवळपास ७ ते ८ महिने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी कायम प्रेमाचा वर्षाव केला. आता मालिकेत एक मोठा बदल घडणार आहे. कारण, मालिकेत तुळजाची मुख्य भूमिका साकारणारी दिशा परदेशी मालिकेला निरोप देत आहे. दिशाऐवजी आता मालिकेत नवीन तुळजा पाहायला मिळेल.
आता तुळजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर पाहायला मिळेल. मृण्मयी गोंधळेकरने यापूर्वी तिने ‘स्टार प्रवाह’च्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत पुनर्जन्माच्या ट्रॅकमध्ये ‘राजमा’ची भूमिका साकारली होती. आता ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत मृण्मयीची एन्ट्री केव्हा होणार, प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दररोज रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाते.