आघाडीच्य मराठी वाहिन्यांवर गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी सध्या प्रत्येक वाहिनीकडून प्रचंड मेहनत घेतली जात आहे. अशातच ‘झी मराठी’वर जुलै महिन्यात एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा दमदार पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘लागीर झालं जी’ फेम नितीश चव्हाण बऱ्याच वर्षांनी ‘झी मराठी’वर पुनरागमन करत असल्याने सध्या प्रत्येकाच्या मनात या मालिकेच्या अनोख्या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा चालू आहे. अभिनेता नितीश चव्हाण या मालिकेमार्फत ‘झी मराठी’वर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर, त्याच्या जोडीला अभिनेत्री दिशा परदेशी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासून ‘लाखात एक आमचा दादा’ नेमकी कधी आणि कोणत्या वेळेला प्रसारित केली जाणार याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता होती. अखेर या मालिकेच्या शुभारंभाची तारीख व वेळ याची अधिकृतपणे ‘झी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. याबरोबर मालिकेचा जबरदस्त प्रोमो देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतो आहे.

हेही वाचा : अभिनेत्री रेशम टिपणीसची मुलं काय काम करतात? अभिनेत्री म्हणाली, “मुलगा ग्राफिक्स डिझायनर, तर मुलगी…”

‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची झलक पाहायला मिळत आहे. अभिनेते मालिकेत ‘तुळजा’च्या म्हणजेच दिशा परदेशीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. त्यांची भूमिका सूर्या दादा आणि तुळजाच्या प्रेमाला विरोध दर्शवणारी असेल. याशिवाय सूर्या दादावर चार बहि‍णींची जबाबदारी असते. त्यांची लग्न चांगल्या घरात करून द्यायची असा निश्चय सूर्या दादा करतो असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

चार बहिणींचा सांभाळ करणारा आणि आपल्या बहिणींना आईची माया देणाऱ्या भावाची कथा या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नितीश या मालिकेत सूर्यादादाची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चार जणी सूर्या दादाच्या बहिणीच्या रुपात झळकणार आहेत.

हेही वाचा : सई ताम्हणकर झाली ‘बिझनेस वुमन’! वाढदिवसानिमित्त दिली आनंदाची बातमी, सुरू केला ‘हा’ व्यवसाय

‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका ८ जुलैपासून रोज रात्री ८.३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. तसेच या मालिकेचा भव्य पूर्वरंग ७ जुलै रोजी ८.३० वाजता दाखवण्यात येणार आहे. “परिस्थितीने कितीही केला घात, तरी सूर्या दादाला आहे देवाची साथ!” या ब्रीदवाक्यावर हा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर प्रोमोच्या शेवटी आपल्याला नितीश एका वेगळ्या रुपात पाहायला मिळतो.

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर प्रियाच्या हाती लागली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल, सायली-अर्जुनसमोर मोठं संकट, पाहा प्रोमो

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेला कसा टीआरपी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, याच ८.३० च्या स्लॉटला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सध्या टीआरपीच्या शर्यतीत नंबर १ वर असणारी ‘ठरलं तर मग’ मालिका चालू आहे. या मालिकेचा टीआरपी सध्याच्या घडीला सर्वात जास्त आहे. त्यामुळे ‘झी मराठी’ची ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका प्रदर्शित झाल्यावर याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात? ही मालिका ‘ठरलं तर मग’ला टीआरपीच्या शर्यतीत टक्कर देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi lakhat ek amcha dada serial starts from july watch new promo sva 00