Akshaya Deodhar and Divya Pugaonkar on Harshada Khanvilkar: मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांमध्ये कसे नाते आहे, याबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. अनेकदा हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यावेळी सेटवरील गमतीजमती व कलाकारांमधील बॉण्डिंग पाहायला मिळते.

भावना व जान्हवीने केले लक्ष्मीचे कौतुक

अनेकदा मुलाखतींमध्ये हे कलाकार त्यांच्या सहकलाकारांबद्दल वक्तव्यदेखील करताना दिसतात. झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास‘ ही मालिका सध्या लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार काम करताना दिसत आहेत. हर्षदा खानविलकर, दिव्या पुगावकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, मेघन जाधव, निखिल राजेशिर्के असे अनेक कलाकार या मालिकेत काम करताना दिसत आहेत.

आता अभिनेत्री अक्षया देवधर आणि दिव्या पुगावकर यांनी हर्षदा खानविलकर यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. अक्षया आणि दिव्याने नुकताच ‘स्टार मीडिया मराठी’शी संवाद साधला. यावेळी हर्षदा खानविलकर यांचे कौतुक करीत दिव्या म्हणाली, “सगळेच तिच्या जवळचे आहेत. ती एका कोणाच्या जवळची आहे, असं नाही. ती सगळ्यांची आई आहे. त्यामुळे ती सगळ्यांना आवडते, हवीहवीशी वाटते.

अक्षया म्हणाली, “आम्ही सगळे तिचे लाडके आहोत, असे आम्ही म्हणतोच. जर ती एका कोणावर जास्त प्रेम करताना दिसली, तर आम्ही तिला सांगतो की, आम्हीसुद्धा आहोत. दिव्या अक्षयाच्या मताशी सहमत होत म्हणाली की, आम्ही तिला सांगतो हे जरा अति होतंय, थांब.

दिव्या पुढे म्हणाली की, आपण तिच्यापुढे एखादी गोष्ट म्हणालो की, ती गोष्ट आपल्यासमोर हजर असते. ती म्हणाली की, त्या दिवशी अक्षयाला चहा-खारी खायची होती. ती सहज म्हणून गेली. साधारण पुढच्या अर्ध्या तासात तिच्यासमोर खारी, बटर, टोस्ट असं सगळं हजर होतं. त्यानंतर चहा आला. अक्षया म्हणाली की, ताईला कळलं म्हणजे देवाला कळल्यासारखं आहे. ताईला कळलं की, अमुक एखादी गोष्ट हिला हवी आहे, तर ती आपल्यापर्यंत पोहचेल, याची सोय ती करते.

दिव्या म्हणाली की, आता आम्हाला असं होतं की, ताईसमोर काही बोलू की नको. त्यामुळे आता आम्ही ताईसमोर गोष्टी लक्षात ठेवून बोलतो, असे म्हणत अक्षया आणि दिव्या यांनी हर्षदा खानविलकर यांचे कौतुक केले आहे.

दरम्यान, लक्ष्मी निवास या मालिकेत हर्षदा खानविलकर यांनी लक्ष्मी ही भूमिका साकारली आहे. तर, तुषार दळवी यांनी श्रीनिवास ही भूमिका साकारली आहे. भावना व जान्हवी या लक्ष्मी-श्रीनिवासच्या मुली आहेत. लक्ष्मी व श्रीनिवास त्यांच्या कुटुंबाला जोडून ठेवतात. या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता असल्याचे दिसते.